समूह नृत्य स्पर्धा : नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने येथे केले प्रथमच आयोजनपांढरकवडा : येथील नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे शनिवारी घेण्यात आलेल्या महिलांच्या समूह नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमामुळे महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला.या स्पर्धेत शहरातील सर्वच स्तरातील १५ महिला समूहांतील जवळपास १६८ घरगुती व नोकरदार महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. येथे हजारो रसिक महिलांच्या उपस्थितीत झालेल्या या नृत्य स्पर्धेत महिलांच्या समूहांनी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. स्पर्धेचे आठ हजार रूपयांचे प्रथम पारितोषिक इरा-सुका परधान आदिवासी समूहाने पटकाविले. पाच हजारांचे द्वितीय पारितोषिक महिला टिचर्स ग्रुपने, तर तीन हजारांचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक राजस्थानी बंजारा समूहाने पटकाविले.ही सर्व पारितोषिके नुरजहा अकबर अली खेतानी यांनी जाहीर केली होती. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता कर्णेवार, नगराध्यक्ष वंदना रॉय यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. दुसऱ्या दिवशी महिलांसाठी आनंद मेळावा घेण्यात आला. त्यात श्रद्धा महिला बचत गट, दुर्गा महिला बचत गट, दत्त प्रसन्न गट, भुवनेश्वरी गट, नवशक्ती गट, उत्कृष्ट महिला गट आदी महिला गटांनी सहभाग नोंदविला. महिलांसाठी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ महिला बकुल तोडासे यांनी केले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष वंदना रॉय, प्रमुख पाहुण्या म्हणून उपनगराध्यक्ष सुनंदा देशमुख, प्रीती चोटपल्लीवार, माजी नगराध्यक्ष शंकर बडे, भाऊराव मरापे, दीपाली नक्षणे, पूजा भोयर, साजीद शरीफ, गौरी बढे, नंदिनी आत्राम, विशाल सिडाम उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण नुरजहा खेतानी, शीतल खेरा, सचिन डंभारे, सचिन डोंगरे यांनी केले. संचालन नगरसेविका मंजुषा तिरपुडे यांनी केले. शिरेष क्षीरसागर, मंगेश चांदेकर, सुहास पंडित, रवी नस्कुलवार, भाऊ अंबाडकर, संतोष व्यास आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
पांढरकवडा येथे महिलांच्या कलागुणांना वाव
By admin | Updated: November 10, 2015 03:09 IST