पारा ३८ वर : मानवासह पशुपक्षी, वन्यजीवही हैराण पुसद : गत दोन दिवसांपासून पुसद शहराच्या तापमानात अचानक वाढ झाली असून पारा ३८ अंशावर पोहोचला आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असून दुपारी तर बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. वाढत्या उन्हाचा फटका मानवासोबतच पशुपक्षी आणि वन्यजीवांनाही बसत आहे.पुसद शहर विदर्भातील सर्वाधिक तापमानाचे शहर म्हणून ओळखले जाते. मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि ढगाळी वातावरणामुळे उन्हाची तीव्रता जाणवली नाही. परंतु गत दोन-तीन दिवसांपासून वातावरण निरभ्र झाले असून तापमान वाढत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असल्याचे दिसत आहे. उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. पहाटेच्यावेळी थंड हवा वाहत आहे. सकाळी ९ नंतर वातावरण हळूहळू बदलून तापमान वाढत जाते. यापासून संरक्षण व्हावे म्हणून नागरिक टोप्या, छत्री, रुमाल बांधत आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम जलस्रोतावरही होत आहे. नदी, नाले, ओढे कोरडे पडले असून विहिरीतील पाणी पातळीही सपाट्याने कमी होत आहे. पुसद शहराची जीवनदायी असलेल्या पूस नदीचे पात्रही कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. नदी प्रवाहातील पाण्याची लहान मोठी डबकी आटत चालल्याने पशुपक्षी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासोबतच जंगलातील पशुपक्षी व वन्यजीवांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. वनविभागाने अद्यापही पानवठे निर्माण केले नाही. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तापमान ३८ वर पोहोचल्याने आगामी काही दिवसात तापमान ४० ते ४२ अंश सेल्सीअस होण्याची शक्यता आहे. वाढत चाललेल्या उन्हामुळे थंडपेयाची मागणी वाढली आहे. दिवसभर उन्ह राहत असल्याने दुपारी बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. अद्याप उष्माघाताचे रुग्ण आढळून आले नसले तरी शासकीय रुग्णालयाने नागरिकांना सूचना दिल्या आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे व सावलीचा आधार घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)आरोग्याच्या तक्रारी वाढल्या विडूळ - गत काही दिवसात तापमानात वाढ झाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये आरोग्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालय हाऊसफुल्ल दिसत आहे. साधारणत: तापमानात वाढ होताच तापाचे रुग्ण आढळून येतात. सध्या विषाणू जन्य तापाच्या रुग्णात वाढ झाल्याचे दिसत आहे. याशिवाय पाण्याची पातळी खोल गेल्याने दूषित पाणी प्राशनाने काविळाची लक्षणेही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. विशेषत: ताप, डोके दुखी, गळ्याची आग होणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, हगवण, उल्टी आदी रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांनी घराबाहेर जाणे टाळून पाण्याचा अधिकाधिक वापर करावा, असे डॉक्टर सांगतात.
उन्हाच्या चटक्याने लाहीलाही
By admin | Updated: April 5, 2015 00:02 IST