५८ शिक्षकांच्या जीवनाचा खेळ : आंतरजिल्हा बदलीच्या ‘जीआर’नंतरही मिळेना दादअविनाश साबापुरे यवतमाळ ग्रामीण विद्यार्थ्यांची पिढी घडविणारे होतकरू शिक्षक स्वत:च्या लेकरांपासून मात्र दुरावलेले आहेत. बाबा पांढरकवडा तालुक्याच्या आदिवासी गावात तर आई पुणे जिल्ह्यात नोकरी करते. अशी एक-दोन नव्हे ५८ जोडपी आहेत. नोकरीसाठी आई-बाबा दूर-दूर असताना त्यांच्या मुलांचे बालपण मात्र करपून जात आहे. विशेष म्हणजे आंतरजिल्हा बदलीसाठी या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे वारंवार दाद मागूनही केवळ टोलवाटोलवी सुरू आहे.यवतमाळ जिल्हा परिषदेकडे ५८ कर्मचाऱ्यांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केले आहेत. पती-पत्नी एकत्रीकरण धोरणानुसार त्यांच्या अर्जावर विचार होण्याची गरज असताना त्यांना दाद मिळेनाशी झालेली आहे. के. पी. डंभारे (हिंगोली), एम. व्ही. मुंडकर (गडचिरोली), ए. डी. गोविंदवार (धुळे), आय. एस. हांडे (हिंगोली), आर. यू. केंद्रे (गडचिरोली), ए. एन. गोपाल (औरंगाबाद), पी. टी. कबले (बुलडाणा), बी. डी. जागृत (नांदेड), एस. एस. केराम (बुलडाणा), डी. के. कोहचड (बुलडाणा), चिंचोले (औरंगाबाद), प्रमोद केंद्रे (गडचिरोली), मेघराज पवार (गडचिरोली), प्रेम राठोड (बुलडाणा), रश्मी गुरनुले (रत्नागिरी), राऊत (कोल्हापूर), निखिल पांगुळकर (नांदेड), पुष्पा जायभाये (नंदूरबार) आदी मूळ यवतमाळमधील शिक्षक-शिक्षिका गेल्या कित्येक वर्षांपासून इतर जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या आयुष्याचे जोडीदार मात्र यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यामुळे महिनोन्महिने पती-पत्नी-मुलांची भेट होणे अशक्य झाले आहे. विशेष म्हणजे, ग्रामविकास मंत्रालयाने पती-पत्नी एकत्रीकरणासाठी कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्या सहानुभूतीपूर्वक करण्याचा आदेश २९ सप्टेंबर २०११ रोजी निर्गमित केला आहे. परंतु, यवतमाळ जिल्हा परिषदेत या आदेशाकडे कानाडोळा केला जात असल्याचे दिसते. ३१ मार्चपर्यंत आंतरजिल्हा बदल्या करण्याचे निर्देश असून जिल्हा परिषदेत यासंदर्भात हालचाल दिसत नसल्याने शिक्षक कर्मचारी संतापले आहेत.
जोडीदार दूर ठेवून थाटला शाळेचा संसार
By admin | Updated: March 30, 2016 02:37 IST