वणी : तालुक्यातील राजूर कॉलरी येथे तालुका आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जागतिक मानसिक रोग निदान दिनानिमित्त मानसिक आरोग्य व आरोग्य संवर्धन या विषयावर १0 आॅक्टोबरला समाज प्रबोधन कार्यशाळा घेण्यात आली़प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ़संजय तोडासे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली. राजूर कॉलरी येथील विविध दुर्गम भागातील वस्त्यांमध्ये महिलांना समस्यांची जाणीव करण्यासाठी फोकस ग्रुफ डिस्कशन उपक्रम यावेंळी राबविण्यात आला. डॉ़मारोती खुडे, मनोज पवार यांनी हा उपक्रम राबविला. त्यात व्यक्तिमत्व विकास, स्वयंसमोहनाचा उपयोग करून महिलांच्या मानसिक आरोग्याची कारणे जाणून घेण्यात आली़ यामध्ये धक्कादायक वास्तव दिसून आले़ या उपक्रमात सहभागी महिलांपैकी सुमारे ७० टक्के महिला शौचालय नसल्यामुळे नेहमी शौचविधीस उघड्यावर जातात, असे दिसून आले. त्यामुळे त्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे़ उर्वरित ३० टक्के महिलांनी पती मद्यपी असल्याने मानसिक तणाव असल्याचे सांगितले़ अविवाहित मुलींनी महिलांसाठी शौचालय ही काळाची गरज असल्याचे सांगितले़ महिलांना अंत:करणातून शौचालये गरजेचे आहे, यातून स्पष्ट झाले. राजूर, भालर अशा मोठमोठ्या आणि कोळसा बेल्ट असलेल्या गावांमध्ये महिलांना उघड्यावर शौचाविधीला जावे लागते. शासनाने विविध योजना राबवूनही अनेक गावांतील महिला अद्याप उघड्यावरच शौचाला जातात, हे वास्तव चित्र आहे. यामुळे महिलांची मोठी फरफट होते. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागात सारखी उठबस करावी लागते. त्यामुळे त्यांना विविध आजारही बळावतात. त्यात मानसिक आजारांचे प्रमाण मोठे असल्याचे या कार्यशाळतून स्पष्ट झाले. या घातक प्रवृत्तीमध्ये बदल घडविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, राजूर ग्रामपंचायत व वेकोलिच्या माध्यमातून प्रभावी मोहीम राबविण्याचे आरोग्य यंत्रणे ठरविले आहे. या मोहिमेत महिलांचा मानसिक तणाव दूर करण्याच्या हेतूने व त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होणार नाही, यासाठी शौचालयाची गरज निर्माण करण्याच्या उपक्रमाला विशेष गती देण्यावर भर देण्यात येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
राजूर येथे महिला आरोग्यावर कार्यशाळा
By admin | Updated: October 11, 2014 23:15 IST