यवतमाळ : शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केल्यामुळे सर्व शिक्षक सध्या व्यस्त आहेत. त्यातच पायाभूत चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, ‘सरल’चे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. अशावेळी शिक्षकांकडे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याच्या कामावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम शिक्षकांकडून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांवरच हे अशैक्षणिक काम का लादण्यात आले, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष तथा शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष काळूजी पाटील, बोरसे यांनी १० आॅक्टोबरला सर्व शिक्षक संघटनांची यासाठी बैठक आयोजित केली आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्हाधिकारी व यवतमाळचे नायब तहसीलदार यांना विविध शिक्षक संघटनांच्यावतीने निवेदन देण्यात आले. हे काम शिक्षकांकडून काढून टाकण्याची मागणी त्यात करण्यात आली. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, सरचिटणीस गजानन देऊळकर, मधुकर काठोळे, कैलास राऊत, शरद घारोड, गजानन पोयाम, मुकेश भोयर, इनायत खान, नदीम पटेल, पुंडलिक रेकलवार, मिलिंद भगत, सारंग भटुरकर, एन.एस. निमगडे, विनोद डाखोरे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)दारव्हा येथे वेतनासाठी मोर्चादारव्हा : पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांचा आॅगस्ट व सप्टेंबरच्या प्रलंबित वेतनासाठी सर्व शिक्षक संघटना कृती समितीच्यावतीने पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदींना निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे आॅगस्ट व सप्टेंबरचे वेतन आॅक्टोबर महिन्याच्या ८ तारखेपर्यंतही करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांसमोर मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. अनेकदा मागणी करूनही वेळेत पगार करण्यात येत नाही. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या कृती समितीतर्फे पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी वेतनाबाबत पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. तीन दिवसात वेतन व इतर मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला. मोर्चात महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे संजय बिहाडे, सतीश बोरखडे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे घनश्याम निमकर, राजेश डवले, जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे गणेश कावळे, पी.टी. सरताबे, उर्दू शिक्षक संघटनेचे अब्दुल वहीद, शिक्षक सेनेचे यशवंत पवार यांच्यासह शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
कामाचा बोझा अन् वेतनाची बोंब
By admin | Updated: October 9, 2015 00:27 IST