अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना झाला असे कळताच सख्खा भाऊही भावाला हात लावायला तयार नाही. पण खेड्यातल्या दिलदार माणसांनी आजही कोरोनाच्या भयापेक्षा माणुसकीचे नातेच मोठे मानले आहे. यवतमाळात कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडांची कमतरता भासतेय. ही वार्ता कळताच खेड्यातल्या मजुरांनी जंगल पालथे घालून ट्रॅक्टरभर इंधन गोळा केले अन् दिले पाठवून यवतमाळला. लाॅकडाऊनमध्ये ज्यांच्या उदरनिर्वाहाची काळजी करायला कोणी तयार नाही, ते मजूर मात्र अजूनही समाजाचे ऋण फेडण्यासाठी पोटाला चिमटा घेऊन राबायला तयार आहेत.हे दिलदार मजूर आहेत यवतमाळ तालुक्यातील वरुड या गावचे. झाले असे की, वरुड गावच्या एका तरुणाचा यवतमाळातील दोस्त चार दिवसांपूर्वी कोरोनाने दगावला. कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना फारशी परवानगी नसली, तरी हा मित्र स्मशानभूमीत पोहोचला. दुरूनच त्याने अंत्यदर्शन घेतले. पण एकाच दिवशी खूप अंत्यविधी असल्याने स्मशानभूमीत लाकडांची टंचाई असल्याचे त्याला जाणवले. तो गावात पोहोचला अन् त्याने आपल्या सर्व मजूर मित्रांना यवतमाळातील परिस्थिती सांगितली. यवतमाळात कोरोनाने दररोज माणसे मरत आहेत, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेला लाकडेही मिळणे कठीण झाले आहे... हे ऐकून वरुड गावातील मजूर सरसावले. गावकऱ्यांनीही त्यांना साथ दिली. ज्यांच्या घरी लाकडे होती, ती त्यांनी काढून दिली. काही जणांनी शेतातून तर काहींनी आजूबाजूच्या जंगलातून जळाऊ लाकडे गोळा केली. चार दिवस खपल्यावर एका ट्रॅक्टरची भरती झाली. तेव्हा साऱ्यांना समाधान वाटले. मंगळवारी सकाळीच हा ट्रॅक्टर घेऊन वरुड येथील गावकरी यवतमाळात धडकले. राजन भुरे, मंगेश बादुरकार, रमेश बोबडे, बडू कुंभारे, भगवान घागी, मंगेश बोबडे, रमेश काकडे, श्रावण मडपाचे, रामाजी मनपाचे, यश भुरे, बादल टेकाम, वश भुरे, लक्ष्मण मनपाचे, सतीश टेकाम हे सारेच ट्रॅक्टरसोबत थेट स्मशानभूमीत पोहोचले आणि स्वत:च लाकडे उतरवून दिली. कुणाशी बोलून श्रेय लाटण्याचा प्रयत्न न करता हे सर्व जण आल्यापावली गावाकडे निघून गेले. मात्र जाताना शहराला मदत देऊन गेले.
शहराने मानले खेड्याचे आभार !यवतमाळात लाकडांची टंचाई झाल्याने कोरोना मृतांचा अंत्यविधीही संकटात सापडला होता. मात्र वरुडसारख्या खेड्यातील मजुरांनी लाकडे आणून दिल्याने हातभार लागला. असेच दान इतरही खेड्यांतील लोकांनी केले, तर इंधन टंचाईचा प्रश्न कायमचा मिटेल, अशी भावना वरुड येथील राजन भुरे यांनी व्यक्त केली. तर यवतमाळ पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विजय अग्रवाल यांनी या दानाकरिता वरुडवासीयांचे आभार मानले.