मुकुटबन : परिसरातील तेजापूर येथील दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी, या मागणीसाठी तेथील महिलांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत येथील पोलीस ठाण्याला सोमवारी ग्रामपंचायतीच्या ठरावनिशी निवेदन देण्यात आला आहे.तेजापूर हे गाव वणी तालुक्यात येते. मात्र हेच गाव मुकुटबन पोलीस ठाण्यात समाविष्ट आहे. सन २००० मध्ये तेथील गुरूदेव सेवा मंडळाची नोंदणी झाली. मंडळाने गाव स्वच्छ, सुंदर व आध्यात्मिकतेकडे वळावे, यासाठी तसेच राष्ट्रसंतांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र गाव उन्नतीकडे वळण्यापेक्षा अधोगतीकडे वळत असून युवक व्यसनाधीन होत असल्याचे लक्षात येऊ लागताच मंडळाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात गावात दोघे जण पोलिसांना हाताशी धरून दारूचा व्यवसाय करीत असल्याचे लक्षात आले. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे आध्यात्मिककडे वळलेले गावातील अनेक युवक आता दारूमुळे व्यसनाधीन होत आहे. त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. गावातील शांतता भंग होत असून भविष्यात अनुचित प्रकार घडण्याचीही शक्यता बळावली आहे. गावात तंटे निर्माण होत आहे. घराघरांमध्ये वाद होत आहेत. कष्टाची कमाई दारूत खर्च होत आहे. परिणामी अनेक कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीवरही विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे गावातील महिलांनी कायमस्वरूपी दारू बंदी करावी, अशी मागणी केली आहे. त्याबाबत पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे. सोबतच ग्रामपंचायतीचा ठरावसुद्धा निवेदनाला जोडण्यात आला आहे. आता पोलीस काय भूमिका घेतात, याकडे तेजापूरवासीयांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)
दारू कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महिलांचा ‘एल्गार’
By admin | Updated: February 18, 2015 02:12 IST