सखी सन्मान सोहळा : रविवारी पुरस्कार वितरण यवतमाळ : लोकमत सखी मंचच्यावतीने देण्यात येणाऱ्या सखी सन्मान पुरस्कारासाठी आमंत्रित प्रस्तावांचे विविध क्षेत्रातील नामवंत ज्युरींनी शुक्रवारी परीक्षण केले. स्त्रीशक्तीच्या अतुलनीय कार्याचे एका पेक्षा एक सरस प्रस्ताव पाहून ज्युरीज मंडळ भारावून गेले. विविध क्षेत्रातील शंभरापेक्षा अधिक प्रस्तावांचे परीक्षण करताना ज्युरीज मंडळाचेही कौशल्य पणाला लागले. ज्युरीज मंडळातील तज्ज्ञांनी निवडलेल्या व्यक्तींचा गौरव रविवार २३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता दर्डा मातोश्री सभागृहात करण्यात येणार आहे. स्त्रीशक्तीच्या अतुलनीय कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी लोकमत सखी मंचने सामाजिक, शौर्य, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक, व्यावसायिक-औद्योगिक, सांस्कृतिक-साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रस्ताव मागविले होते. जिल्हाभरातील महिलांनी आपल्या कार्य कर्तृत्वाचे प्रस्ताव सादर केले. या प्रस्तावांचे परीक्षण शुक्रवार २१ आॅक्टोबर रोजी लोकमत जिल्हा कार्यालयात आयोजित एका बैठकीत त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ ज्युरीजनी केले. प्राप्त झालेल्या प्रस्तावात सर्वाधिक प्रस्ताव होते ते सामाजिक गटातील. २५ पेक्षा अधिक प्रस्ताव या गटात आले होते. या प्रस्तावांचे परीक्षण सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. घनश्याम दरणे आणि यवतमाळातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भारती जानी यांनी केले. सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातही यवतमाळ जिल्ह्यातील महिला कुठे मागे नाही, हे या गटातील प्रस्ताव पाहून पुढे आले. तब्बल १७ महिलांनी यासाठी आपले प्रस्ताव पाठविले होते. या प्रस्तावांचे परीक्षण अमोलकचंद महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. किशोर गिरडकर, भरतकाम आणि काष्ठशिल्पमध्ये मध्यप्रदेश सरकारचे दोन पुरस्कार मिळविणाऱ्या रजनी शिर्के, यवतमाळ आकाशवाणीच्या उद्घोषिका मंगला माळवे यांनी परीक्षण केले. (नगर प्रतिनिधी) पुरस्कारांची घोषणा सखी सन्मान सोहळ्यासाठी तज्ज्ञ ज्युरीज मंडळाने निवडलेल्या सामाजिक, शौर्य, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक, व्यावसायिक-औद्योगिक, सांस्कृतिक-साहित्यिक आणि जीवनगौरव पुरस्काराची घोषणा ‘लोकमत’मध्ये रविवार २३ आॅक्टोबरच्या अंकात केली जाणार आहे. सायंकाळी होणाऱ्या सोहळ्यात त्यांना गौरविले जाईल.
महिलांच्या कर्तृत्व प्रस्तावांनी ज्युरीज भारावले
By admin | Updated: October 22, 2016 01:26 IST