बाभूळगाव : तालुक्यात अवैध दारू विक्री ने उच्चांक गाठला असून, त्याचा फटका ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. यातच महिलांनी केलेल्या तक्रारींकडे पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सौजना, रेणुकापूर, नांदूरा येथील महिलांनी दारुबंदीसाठी पोलीस ठाण्यावर धडक दिली. पोलिसांकडून अवैध दारूविक्रीवर कोणतीही रोकथाम होत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी मंगळवारी बाभूळगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी सरुळ गावात दारुबंदी करण्याची मागणी असणारे निवेदन पोलीस उपनिरीक्षक सचिन सेलोकर यांना देण्यता आले. सरुळ गावात अवैधरित्या देशी दारू, हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात येत आहे. यामुळे गावातील तरुण मंडळी व्यसनाधिन झाले असून, गावात शांतता व सुव्यवस्था भंग होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मद्यधुंद अवस्थेतील काही तरुणांनी गावात छेडखानी व चोरी करण्याच्या घटना घडल्या. त्याअनुषंगाने गावाचे वातावरण कलुषित होऊ नये म्हणून येथील पार्वती महिला बचत गट, दुर्गामाता महिला बचत गट, क्रांती महिला बचत गट, लक्ष्मी महिला बचत गट, मायावती महिला बचत गट, पंचशील महिला बचत गट आदी महिला बचत गटांच्या सदस्य, तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत सदस्यांसह गावकऱ्यांनी संयुक्तपणे पोलीस निरीक्षकांना दारूबंदीबाबत निवेदन सादर केले. या निवेदनावर सुमारे १७३ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देताना जिजा वाघ, वनिता मंदारे, प्रभा कंगाले, बेबी राऊत, अर्चना दुर्वे, कमला नागोसे, सविता हिवराळे, सुषमा शिकराम, बेबी श्रीरामे, सुवर्णा बुटले, अश्विनी बुटले, आशा बुटले, शांता श्रीरामे, नानी वासनीक, मनीषा शेंडे, सतीश राऊत, आनंद सोळंके, अतुल जिरापुरे, राहुल वाघ, दिनेश नागोसे, संदेश शेंडे, अनिल सोळंके, विनोद बुटले आदींसह असंख्य नागरिकांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
दारुबंदीसाठी महिला धडकल्या
By admin | Updated: November 12, 2014 22:52 IST