- रवींद्र चांदेकरयवतमाळ - महागाव तालुक्यातील आमणी (खुर्द) येथील ५० पेक्षा अधिक महिला व बालकांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. लक्ष्मीच्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित महिला व बालकांना तातडीने खासगी दवाखाने, येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारानंतर सर्व विषबाधित महिला व बालकांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. प्राप्त माहितीनुसार आमणी (खुर्द) येथील महिलांना मंगळवारी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास मळमळ, उलटी, जुलाब, भोवळ आणि तीव्र पोटदुखी, अशी लक्षणे जाणवू लागली. काही बालकांमध्येही लक्षणे आढळली. त्यानंतर आमणी गावात एकच धावपळ सुरू झाली. बाधित रुग्णांना मिळेल त्या वाहनाने उपचारासाठी महागाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
रात्री बहुतांश दवाखाने बंद असल्याने रुग्णांना महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात, तसेच सवना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दूषित अन्नातून किंवा दूषित पाण्यातून महिला व बालकांना विषबाधा (फूड पॉयझनिंग) झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. बाधित रुग्णांमध्ये संगीता आडेकर, स्वाती शिंदे, कमल बेद्रे, लक्ष्मी चिरंगे, प्रिया बेले, अश्विनी बेले, प्रणव खोकले, शारदा खोकले, वेदिका खोकले, सुनीता पुंडे, सुनीता भलगे, कुणाल मेतकर, सुनीता वानखेडे, ललिता वाडेकर, महानंदा मोरे, शारदा सरनाटे, सारिका सरनाटे, अश्विनी सरनाटे, मारुती सरनाटे, ताईबाई काळबांडे, सलोनी मोरे, सविता मन्ने, पूजा मन्ने, पद्मिना मन्ने, उषा शिंदे, अनुसया नरवाडे, पुण्यरथा रणमले यांच्यावर उपचार करण्यात आले.
दूषित अन्न, पाण्यातून झाला प्रकार दरम्यान, या घटनेला फूड पाॅयझनींग म्हणता येणार नाही, असे सवना ग्रामीण रुग्णालयाचे डाॅ. प्रीतेश दुधे यांनी सांगितले. दूषित पाणी किंवा दूषित अन्नातून हा प्रकार झाला असावा असा अंदाज त्यांनी वर्तविला. सर्वांची प्रकृती चांगली असल्याचेही त्यांंनी स्पष्ट केले.