पोपटराव पवार : आदर्श गावाकरिता तळणी येथे ग्रामसभातळणी : आदर्श गावाच्या निर्मितीसाठी पक्षीय राजकारण दूर ठेवून मतभेद विसरून ग्रामविकासाचे कार्य करावे, असे आवाहन हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनी केले. आर्णी तालुक्यातील तळणी येथे आदर्श गाव पाहणीसाठी आले असताना संत शांताआई सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी तळणीच्या सरपंच कुसूमबाई लोणकर होत्या. प्रमुख पाहुणे देवराव महाराज, सत्तार खान, हरिभाऊ डेहणकर, सुनील पोतगंटवार, विष्णू लोणकर, अशोक वाघमारे, किसन जाधव, शांतीकुमार माळवी, सुभाष बोक्से, सैयद कादीर, संजय लोणकर, श्रीराम मेश्राम, विलास हलबी उपस्थित होते. सर्वांना ईश्वर जरी वेगवेगळ्या रूपात दिसत असला तरी त्याचे आध्यात्मिक रूप एकच आहे. कोणताही धर्म मानव धर्मापेक्षा मोठा नाही, असे मत पवार यांनी ग्रामसभेला संबोधित करताना व्यक्त केले. ग्रामगीतेमध्ये ग्रामविकासाचे रहस्य दडलेले आहे. आमदार ख्वाजा बेग यांच्या ग्रामगीतेच्या अभ्यासाने त्याचप्रमाणे कृतीपूर्ण कार्यक्रमाने आर्णी तालुका ग्रामविकासाच्या भक्तीत पुढे जावू शकतो, असे पवार यांनी सांगितले. गावामध्ये वाचनालय, स्पर्धा परीक्षेसाठीचे केंद्र, मैदान अशा शिफारशी त्यांनी केल्या. गावाला विकासाच्या दिशेने नेण्याचे कार्य युवकच करू शकतात, असे त्यांनी सांगितले. आदर्श गाव पाहणीसाठी तळणी येथे आगमन होताच ग्रामपंचायत व गावकऱ्यांकडून पोपटराव पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कृषी उपसंचालक कराळे, रविकांत गौतमी, चंद्रकांत गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच शाहीद रयाणी यांनी केले. पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामसेवक सगरूळे, तलाठी चव्हाण, कृषी सहायक गुघाने उपस्थित होते. (वार्ताहर)
राजकारण न करता ग्रामविकास साधा
By admin | Updated: September 14, 2016 01:22 IST