१२ वर्षापासून मुलगा बेपत्ता : शोध घेऊन थकल्याने यवतमाळात घेतला आश्रयरूपेश उत्तरवार यवतमाळ यवतमाळ : डोक्याचे केस पिकले. नजरेने दिसतही नाही. अंगात त्राण नाही. कानाने ऐकायला येत नाही. अशा स्थितीत म्हातारपणाचा आधार असलेला मुलगाच बेपत्ता झाला. त्या कुटुंबावर आकाशच कोसळले. वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीरचे वृद्ध दाम्पत्य गत १० ते १२ वर्षांपासून मुलाचा शोध घेत आहे. मात्र मुलाचा थांगपत्ता लागला नाही. आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तरी मुलाची भेट होईल, अशी भाबडी आशा त्या दाम्पत्याला आहे. मात्र आता आयुष्याच्या अखेरच्या क्षणाला दोन घास देणार कोण, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे.वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीरचे बंडू कोंडाराम चाफले १२ वर्षांपासून आपल्या मुलाच्या शोधात आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शकुंतला आधार देत खंबिरपणे उभी आहे. १२ वर्षांपूर्वी चाफले दाम्पत्याचा बालाजी नावाचा मुलगा रोजगाराच्या शोधात सुरतला गेला. त्याच्या हाताला काम लागले. यानंतर दोन वेळा तो गावाकडे आला. मात्र नंतर तो गावाकडे फिरकलाच नाही.बंडू चाफले तेव्हापासून आपल्या मुलाचा शोध घेत आहे. पूर्वीपासून रोजमजुरी करणारे कुटुंब किती दिवस तग धरणार? म्हणून मिळेल ते काम करायचे, पैसे जमले की मुलाचा शोध घ्यायचा, असे सुरू आहे. आज त्यांच्याजवळ जमापुंजी नाही. राहायला घर नाही. जांबमधील एका शेतावर रखवालीचे काम करणारे हे कुटुंब थकले आहे. काही दिवस त्यांना राहण्यासाठी गोठा होता. आता तोही नाही आहे. यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. राहायला घर नाही. रेशनकार्ड नाही. आधारकार्ड नाही. यामुळे शासकीय धान्य त्यांना मिळत नाही. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. निराधार असतानाही निराधार योजनेचे मानधन मिळत नाही.अशा स्थितीत पुढचे दिवस काढायचे कसे, असा गंभीर प्रश्न चाफले दाम्पत्याला पडला आहे. हे दाम्पत्य सध्या यवतमाळच्या मुलकी परिसरात आश्रय मिळेल त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांच्या निवाऱ्याचा आणि पोटभर अन्नाचा प्रश्न अजूनही सुटला नाही.
‘त्या’ दाम्पत्याला हवा मदतीचा हात
By admin | Updated: October 17, 2016 01:36 IST