यवतमाळ : संपूर्ण यवतमाळ वन वृत्तातच स्थानिक जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून कोट्यावधी रुपयांची जल व मृदा संधारणाची कामे राखीव वनात करण्यात आली. मात्र यातील बहुतांश कामे कागदोपत्रीच झाली असल्याने पाणी आणि खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वन्यप्राणी जंगल सोडून गावाकडे धाव घेत आहे. त्यातूनच वन्यप्राणी आणि मनुष्य असा संघर्ष यवतमाळ वनवृत्तात पाहायला मिळत आहे. या बाबीवर पुसद वन विभागातील सावरगाव बंगला येथे झालेल्या बिबटाच्या शिकारीने एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे. यवतमाळ, वाशिम, अकोला या तीन जिल्ह्यांमध्ये यवतमाळ वनवृत्त व्यापले आहे. तीन जिल्ह्यांमध्ये हे वनवृत्त असल्याने तीनही ठिकाणच्या जिल्हा विकास व नियोजन समितीच्या निधीतून यवतमाळ या एकाच वनवृत्तात कोट्यावधी रुपयांची जल व मृदा संधारणाची कामे वन विभागाने केली. त्यासाठी काही लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते, पदाधिकारी, कंत्राटदार यांना ही कामे देण्यात आली. वास्तविक ही कामे वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कुशल आणि अकुशल मजूर वापरून व आवश्यक त्या ठिकाणी मशीनद्वारे करायची होती. असे असताना नियम धाब्यावर बसवून ३० टक्के वाटा ठेवून वन विभागाने ही कामे त्या कंत्राटदारांना दिली. ३० टक्के दिल्यानंतर या कामांचा दर्जा काय राहील, याची कल्पना येते. त्यामुळे कोट्यावधीचे पानवठे, वनतळे, माती नाला बांध आणि अन्य विकास कामे कागदोपत्रीच झाली. परिणामी जंगलातील पाण्याचे स्त्रोत निर्माण झाले नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या पाण्याचा आणि खाद्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे जंगली श्वापद आणि वन्यप्राणी खाद्य व पाण्यासाठी गावाकडे अथवा मानवी वस्त्यांकडे धाव घेवू लागली आहे. त्यातूनच यवतमाळ वन वृत्तात अनेक ठिकाणी मनुष्य आणि वन्यप्राणी असा संघर्ष पाहायला मिळाला. त्यामध्ये वन्यप्राण्यांचा नाहक बळी गेला. पुसद वनविभागातील शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्रातील सावरगाव बंगला येथे एका पितापुत्राने आपल्या शेळ्यांवर ताव मारल्याच्या कारणावरून बिबटावर विषप्रयोग केला. या घटनेने जल व मृदा संधारणाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
वनातील जलसंधारण, पानवठे कागदोपत्री
By admin | Updated: October 29, 2014 22:56 IST