लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उन्हाळ्याची चाहूल लागताच उकाडा वाढला आहे. त्यामुळे कुलरही बाहेर निघाले आहे. अशा स्थितीत विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. दिवसभरात अनेकदा वीज गूल होते. वीज वितरण विभाग मात्र भारनियमनच नाही, कामे सुरू असली, तरच त्या-त्या भागाचा पुरवठा खंडित केला जातो, असे सांगत आहे. परंतु, ग्राहक आतापासूनच वैतागले आहे. पुढे उन्हाळ्यात जीव उकळून निघतो की काय, असे वाटत आहे.
वीज वितरण केवळ बिलाचा भरणा करण्यासाठी अॅक्शन मोडवर काम करते. ग्राहकांना मनस्ताप होऊ नये, यासाठी मात्र ठोस उपाययोजना करीत नाही, अशी ओरड ग्राहकांकडून सातत्याने केली जाते. दरमहा येणाऱ्या वीज बिलाचाही अनेक ग्राहकांना ताळमेळच लागत नाही. ग्रामीण भागातील ग्राहकांना, तर विजेसंबंधीच्या अनेक समस्या आहे. सोलर ग्राहकांवरही भुर्दंड लावण्याच्या हालचाली महावितरण विभागाने चालविला आहे. उन्हाळ्यात विजेची अधिक मागणी असते. उकाड्यापासून दिलासा मिळावा, म्हणून कुलर, पंखे लावले जाते. मात्र याच काळात वीज वितरणकडून नियमित वीजपुरवठा केला जात नाही. सध्या काही भागांत याचा अनुभवही ग्राहकांना येत आहे.
उन्हाळ्यात होल्टेजची मोठी समस्या निर्माण होते. फॅन, आणि कुलरची फूल स्पीड केल्यानंतरही हवा येत नसल्याची तक्रार नागरिकांची असते. हिवाळा आणि पावसाळ्यात वेगाने फिरणारे पंखे उन्हाळ्यातच का मंद होतात, असा प्रश्न ग्राहकांना पडतो.
वीज गळती जास्त तेथे जास्त भारनियमनवीज गळती जास्त तेथे जास्त भारनियमन ही पद्धत पूर्वी महावितरणकडून राबवली जात होती. आता मात्र वीज गळती आणि भारनियमन याचा एकमेकांशी संबंध राहिलेला नाही. वीज गळती रोखण्यासाठी महावितरणकडून मोहीम राबवली जात आहे. पावसाळा व हिवाळा या ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात वीजबिल अधिक येत असल्याने ग्राहकांमध्ये रोष आहे.
आताच ही स्थिती तर पुढे काय? ग्राहकांसमोर प्रश्नउन्हाळ्याची चाहूल लागताच काही भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. गत काही दिवसांपासून तापमानही वाढले आहे. अशास्थितीत वीज गूल होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. आताच ही स्थिती तर पुढे काय असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. उन्हामुळे घामाघूम झालेले नागरिक थंड हवेसाठी कुलर, एसी घरी बसवितात. परंतु, विजेच्या लपंडावासोबतच वीज दरही घाम फोडते. वीज बिलही दुप्पट येते.
जाणून घ्या शहरात का केले जाते भारनियमन ?गत काही वर्षापासून महावितरण भारनियम नाही, असा दावा करीत असले तरी उन्हाळ्यात वीज गूल होण्याचे प्रमाण अधिक असते. ग्रामीण भागासोबतच शहरातही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहे.
४ महिने उन्हाळ्यात अघोषित भारनियमनाचा सामनादरवर्षी उन्हाळ्यात ग्रामीण व शहरी भागातील जनतेला अघोषित भारनियमनाचा सामना करावा लागतो. चिमुकल्या मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना उकाड्याचा असह्य असा त्रास होतो.
"महावितरणकडून कुठलेही भारनियमन केले जात नाही. सोलरची कामे सुरू असल्याने त्या-त्या भागाचा तात्पुरता वीजपुरवठा बंद केला जातो. यावर्षी उन्हाळ्यात लोड वाढून वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविले आहे. पिंपळगावसाठी स्वतंत्र ३३ केव्हीची वाहिनी टाकली जाणार आहे."- प्रवीण दरोली, अधीक्षक अभियंता