कोरोनाची दुसरी लाट कमी होत असून राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यांत जाणाऱ्या अतिजलद रेल्वे बंद पडल्या होत्या. त्या आता पूर्ववत सुरू झाल्या असून राज्यातील अनेक अति जलद रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत; परंतु वणीला थांबा असणारी रेल्वे गाडी अद्यापही सुरू झाल्या नाही. यासाठी आता खासदारांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बंद पडलेल्या वणी व वरोरावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांपैकी वणीवरून दररोज नागपूर व मुंबई जाणारी रेल्वे गाडी नंदीग्राम एक्स्प्रेस ही सकाळी ९ वाजता मुंबईसाठी जायची, तर दुपारी १ वाजता नागपूरकडे जाणाऱ्या या रेल्वेमुळे नागरिकांना मोठा लाभ होत होता. तसेच वरोरापासून मुंबई जाणारी सेवाग्राम एक्स्प्रेस, नागपूर वर्धा पॅसेंजर ट्रेन, काझीपेठ एक्स्प्रेस या रेल्वे गाड्याही बंद पडल्या आहेत. त्यामुळे चाकरमाने, विद्यार्थी, शेतकरी, व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनीच या प्रकाराकडे लक्ष देऊन पूर्वीप्रमाणेच सुरू असलेल्या रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या रेल्वे गाड्या सुरू झाल्यास त्यांचा नागरिकांना लाभ होणार असून वेळ व पैशाचीही मोठी बचत होणार आहे.
बंद पडलेल्या रेल्वे गाड्या केव्हा पुर्ववत होणार, वणीकरांचा सवाल : वणी ते मुंबईसाठी घ्यावा लागतो खासगी वाहनाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST