नागरिकांचा घागर मोर्चा : पाणी टंचाईकडे नगरपंचायतीचे दुर्लक्षझरी : शहरात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. पाणी समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता येथील नगरपंचायतीवर नगरसेवक व नागरिकांनी मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकऱ्यांना पाणी समस्या निकाली काढण्याचे आश्वासन देण्यात आले.येथील ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर नगरपंचायत स्तरावरील रचना तयार करून येथील निवडणूक झाली. निवडणूक होऊन बराच कालावधी लोटला. परंतु नगरपंचायत स्तरावरील विकास कामांचा मुहूर्त अजूनही निघाला नाही. शहरात सांडपाणी, वीज, पिण्याचे पाणी आदी मूलभूत समस्यांनी आता डोके वर काढले आहे. येथील पाणी पुरवठा योजना ही गेल्या दीड वर्षांपासून पाईपलाईन लिकेज असल्यामुळे बंद अवस्थेत आहे. ज्या विहिरीतून पाणी घेतले जाते, त्या विहिरीत आत्महत्या झाल्याने गावकऱ्यांनी त्या पाण्यावर अघोषित बहिष्कार टाकला आहे. अशा परिस्थतीत येथील जलस्त्रोत १४ हातपंपावर अवलंबून आहे. मात्र त्यापैकी चार हापंतप नादुरूस्त असल्याने ज्या भागातील हातपंप बंद आहे, त्याठिकाणी पाणी समस्या निर्माण झाली आहे. प्रामुख्याने प्रभाग क्रमांक नऊमध्ये तीव्र पाणी समस्या दिसून येत आहे. याबाबत नगराध्यक्ष मंदा सिडाम व प्रभारी मुख्याधिकारी नायब तहसीलदार कापशीकर यांना विचारणा केली असता, सध्या तांत्रिक कर्मचारी नसल्यामुळे हातपंप दुरूस्ती व नळयोजना दुरूस्तीला विलंब होत असल्याचे सांगण्यात आले. तथापि पुढील आठवड्यापर्यंत पाणी पुरवठा योजना व हातपंप दुरूस्त केल्या जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (शहर प्रतिनिधी)
झरीत पाण्याची कृत्रिम समस्या
By admin | Updated: April 1, 2016 02:53 IST