स्तुत्य उपक्रम : गावातील विहिरींच्या पाणी पातळीत झाली वाढ, शेतीलाही होतो फायदाहिवरी : यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथे ग्रामपंचायत कडून नदीवर बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यात सध्या बऱ्यापैकी पाण्याची साठवण झाली आहे. याचा फायदा नागरिकांना व जनावरांनासुद्धा होत आहे. दरवर्षी उन्हाळ््यातील पाणीटंचाई बघता हिवरी येथील ग्रामपंचायतीने यावर्षी पावसाळ््यापूर्वीच बंधारा बांधण्याचा उपक्रम हाती घेतला. यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना गावकऱ्यांचीही साथ मिळाली त्यातून नदीवर एक मोठा बंधारा बांधण्यात यश आले. त्यानंतर झालेल्या चांगल्या पावसामुळे सध्यास्थितीत या बंधाऱ्यात अडीच ते तीन पुरूष खोल पाणी जमा झाले आहे. या पाण्यामुळे गावातील विहिरींची पातळीही वाढली आहे. जनावरांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. परिसरातील शेतीलाही या पाण्याचा फायदा होत आहे. ग्रामपंचायतकडून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अशा प्रकारचा बंधारा दरवर्षी बांधण्यात येतो. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात या बंधाऱ्याची चांगली मदत होत असल्याचे सकारात्मक चित्र या ठिकाणी निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंद दिसून येत असून, गावाचे सौंदर्यही खुलले आहे. अशा प्रकारचा उपक्रम इतरही गावांनी राबविल्यास पाणीटंचाईवर मात करता येऊ शकते, असे मत हिवरीचे ग्रामविकास अधिकारी आर.बी. अग्रहरी व सरपंच सुवर्णा कुमरे यांनी व्यक्त केले. या बंधाऱ्यासाठी उपसरपंच नितीन गावंडे, सर्व सदस्य व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
ग्रामपंचायतने बांधलेल्या बंधाऱ्यात पाणीच पाणी
By admin | Updated: November 19, 2016 01:29 IST