अनियमित पाणीपुरवठा : नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरूच, आठ दिवसानंतर येतो नळ यवतमाळ : पावसाळ्याला सुरूवात होऊन जवळपास एक महिना लोटला तरीसुद्धा आवश्यक तो पाऊस यवतमाळ शहरात झाला नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही. त्यामुळे आजही शहरातील पाणीटंचाई कायम आहे. गेल्या एक महिन्यात शहरात पावसाचे दोन-तीन ठोक चांगले आले. परंतु प्रकल्प फारसे भरले नाही. आजमितीस निळोणा प्रकल्पात केवळ दहा टक्के पाणीसाठा गोळा झाला आहे. त्यामुळे आठ दिवसातून एकदाच नळ सोडण्याची स्थिती कायम आहे. परंतु काही भागात तीन ते चार दिवसातून एकदा पाणी सोडले जात आहे. ज्या भागात तीव्र पाणीटंचाई होती, ती अद्यापही कायम आहे. शहरातील उमरसरा परिसरातील यशोधरा नगरासह, लोहारा, पिंपळगाव, वाघापूर आदी परिसरातील अनेक भागात उन्हाळ्यासारखीच भीषण पाणीटंचाई कायम आहे. नाही म्हणायला पावसाळा सुरू झाल्यामुळे लोकांची पाण्याची गरज काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे उन्हाळयातएवढे पाणी आता लागत नाही. परंतु पिण्यासाठी आणि वापरासाठी लागणारे आवश्यक पाणीही मिळत नाही. यावर्षी शहरात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे एक महिना पूर्वीपर्यंत नगर परिषदेचे २७ टँकरद्वारा पाणीपुरवठा केला. परंतु आता मात्र तो पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याबाबत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता शहरातील टँकरसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली असून शहरात कुठेही पाणीटंचाई नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरात नव्यानेच समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायत परिसरातील पाणीटंचाई बाबत नगर परिषद पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे यातून दिसून आले. शहरात पाणी टंचाई कायम असून आठ दिवस येणाऱ्या नळामुळे सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. पावसाळ्यातही पाणी साठवून ठेवावे लागत असल्याने महिला त्रस्त दिसत आहे. जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)छतावरून पडणाऱ्या पाण्याचा आधार नळ येत नाहीत, नगर परिषद टँकरने पाणीपुरवठा करण्यास तयार नाही. म्हणून आता नागरिकांनीच यावर उपाययोजना करण्याचे ठरले. पावसाला सुरूवात झाल्यावर अनेकजण आपल्या छतावरून पडणारे पाणी ड्रम व इतर साहित्यांमध्ये गोळा करतात आणि नंतर हे पाणी वापरतात. यामुळे बरीच मदत होत असल्याचे नागरिकांने सांगितले. भर पावसाळ्यातही नळ सोडले जात नाही. नगर परिषद कुणाला विचारायला तयार नाही. पिंपळगाव, लोहारा, उमरसरा परिसरातील नागरिकांसाठी नगर परिषदेत बोलायलाही कुणी नाही. या भागाला नेतृत्वच उरले नाही. अशावेळी तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागातील नागरिकांना आता रेन वॉटर हार्वेस्टिंग किती महत्वाचे आहे, याची जाण व्हायला लागली आहे.
भर पावसाळ्यातही यवतमाळात पाणीटंचाई
By admin | Updated: July 6, 2016 02:44 IST