पात्र झाले अरुंद : वेकोलिचे ढिगारे नदीच्या मुळावर लोकमत न्यूज नेटवर्क वणी : पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवत वेकोलिने तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या तिरावर मातीचे ढिगारे उभे केले. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून खाणीतून निघणारे रसायनयुक्त पाणीदेखील थेट नदीत सोडले जात आहे, परिणामी वर्धा नदीचे खोरे विषाक्त झाले असून प्रदूषण नियंत्रण मंडळाला याकडे लक्ष देत नाही. नदीपात्रापासून ३०० मिटर लांब अंतरावर हे ढिगारे टाकणे गरजेचे होते. मात्र नियमाला तिलांजली देत वेकोलिच्या मुंगोली खाणीतून निघालेल्या मातीचे ढिगारे कोलेरा ते अहेरी गावापर्यंत वर्धा नदीच्या काठावर टाकण्यात आले आहेत. या परिसरात पहाडा एवढे मातीचे ढिगारे उभे आहेत. या ढिगाऱ्यांनी अनेक ठिकाणी नदीचे पात्रच गिळंकृत केले आहे. त्यामुळे नदीचा जवळपास ३० टक्के भाग मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला आहे. कोणत्याही नैैसर्गिक जलस्त्रोताला छेडछाड करता येत नाही. असे असतानाही वेकोलिने मनमानी करीत नदीच्या काठावर मातीचे ढिगारे उभे केले आहेत. मुंगोली व घुग्घूस कोळसा खाणीमुळे वर्धा नदीचे खोरे विषाक्त झाले आहे. पर्यावरण मंत्रालयाने मातीचे ढिगारे टाकण्यासाठीही काही नियम घालून दिले आहेत. ४० मिटर उंचीपेक्षा अधिक उंचीचे मातीचे ढिगारे उभे करता येत नाही. परंतु वेकोलिने या नियमालाही हरताळ फासला आहे. वेकोलिच्या खाणींमधून मोठ्या प्रमाणावर रसायनयुक्त पाणी निघते. नियमानुसार या पाण्यावर प्रक्रीया केल्यानंतरच ते नदीत सोडले जावे, असाही नियम आहे. परंतु वेकोलिचा ईटीपी प्लँट (इंडस्ट्रीयल ट्रीटमेन्ट प्लँट) सशक्त नसल्याने अनेकदा प्रक्रीया न करताच हे पाणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नदीचे पात्र प्रदूषित होत आहे. या नदीच्या पाण्याने सिंचन केले. जाते. रसायनयुक्त पाण्याने जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून पीक उत्पादनावरही परिणाम होत असल्याच्या नदीकाठावरील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. पुराचा धोका वकोलिच्या ढिगाऱ्यामुळे नदीचे नैैसर्गिक पात्र अरुंद झाल्याने चांगला पाऊस झाल्यास नदीच्या पुराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी वर्धा नदीच्या पुराचा फटका अनेक गावांना बसून मोठे नुकसान सोसावे लागले होते. यंदाही पूर परिस्थिती निर्माण झाल्यास मुंगोली कोळसा खाणीलगतच्या कोलेरा, पिंपरी, रांगणा भुरकी, उकणी जुनाडा पिंपळगाव आदी गावांना बसतो.
वर्धा नदीचे खोरे झाले विषाक्त
By admin | Updated: June 8, 2017 01:24 IST