घटनेचा सर्वस्तरातून निषेध : सर्वपक्षीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसादवणी : नर्सरीत जाणाऱ्या निष्पाप कोवळ्या बालकांवरील अत्याचारप्रकरणी स्वस्तिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दीपक जीवने यांना शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे. या संस्थेच्याअंतर्गतच स्थानिक छोरीया ले-आऊटमध्ये ड्रीम्स् प्ले स्कूल चालविली जाते. अटकेनंतर शनिवारी दुपारी दीपक जीवने यांना न्यायालयात हजर करण्यासाठी यवतमाळ येथे नेण्यात आले. दरम्यान, शनिवारी या घटनेचा निषेध करण्यासाठी वणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील सर्वच शाळा-महाविद्यालय बंद होते. सकाळी ८ वाजता सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकांऱ्यांनी एकत्र येऊन मोर्चा काढला. या मोर्चात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाद्वारे बंदचे आवाहन करण्यात येत होते. त्यानंतर शहरातील टिळक चौकात सभा पार पडली. या सभेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रा.पुरूषोत्तम पाटील, कॉ.गीत घोष, अजय धोबे, अॅड.निलेश चौधरी, रवी बेलूरकर आदींची भाषणे झाली. या सर्वांनी घटनेचा निषेध करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी लावून धरली. या सभेनंतर मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात जाऊन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शासन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन दिल्यानंतर सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छोरीया ले-आऊटस्थित ड्रीम्स प्ले स्कूलसमोर जाऊन घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध नोंदविला. भारतीय जनता पार्टी वणी शहरच्यावतीनेही उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अशा घटना घडू नयेत, यासाठी संस्था चालकावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन शहर अध्यक्ष रवी बेलूरकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)
बालकांवरील अत्याचारप्रकरणी वणीच्या संस्थाध्यक्षाला अटक
By admin | Updated: September 11, 2016 00:56 IST