विकास कामांत अडथळा : न्यायालयाचा निकाल पडला लांबणीवरवणी : येथील तत्कालीन नगराध्यक्ष प्रिया लभाने यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्यापासून वणी शहर प्रथम नागरिकाविनाच आहे. परिणामी विकास कामांध्येही अडथळा निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. वर्षभरापूर्वी मनसेच्या नगरसेविका प्रिया लभाने यांची नगराध्यक्षपदी बहुमताने निवड झाली होती. त्यांच्या रूपाने विदर्भात प्रथमच वणीत मनसेने नगरपरिषदेवर सत्ता स्थापन केली होती. मात्र उणापुऱ्या वर्षभरातच लभाने यांच्याविरूद्ध २१ सदस्यांच्या स्वाक्षरीनिशी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. प्रत्यक्षात २0 सदस्यांनी तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. त्यानंतर झालेल्या विशेष सभेत हा अविश्वास ठराव पारितही झाला. मात्र ठराव पारित होताच लभाने यांनी नागपूर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.लभाने यांनी अविश्वास ठरावावरील विशेष सभेला स्विकृत सदस्यांना पाचारण करण्यात आले नसल्याने त्यांना चर्चेत सहभागी होता आले नाही, अशी याचिका नागपूर उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सभेला त्यांना बोलविले नसल्याने त्यांच्या हक्कावर गदा आली, असा दावा त्यांनी याचिकेतून केला आहे. आता ही याचिका उच्च न्यायालयात आहे. त्यावर बुधवारी निकाल अपेक्षित होता. मात्र उच्च न्यायालयाने आता पुढील आठ दिवसांनी या याचिकेवर सुनावणी ठेवण्याचे निर्देश दिल्याची माहिती प्राप्त झाली. परिणामी सध्या याचिकेवरील निकाल प्रलंबित आहे. अविश्वास ठराव पारित झाल्यापासून ‘ब’ दर्जाची वणी नगरपालिका पोरकी झाली आहे. प्रथम नागरिकाविना वणी शहर कायम आहे. शहराला प्रथम नागरिकच नसल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच नगरपरिषद ठरली आहे. परिणामी विकास कामांध्येही अडथळा निर्माण होत आहे. विकास कामे रेंगाळली आहे. त्यातच मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीचा खेळही रंगला आहे. विद्यमान मुख्याधिकाऱ्यांनी वणीत बदली होताच ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. त्यांच्या बाजूने मॅटने निर्णय सुनावल्याची चर्चा असल्याने तेसुद्धा येथून जाणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)वणी शहरात सध्या काही विकास कामे सुरू आहेत. त्यात भूमिगत नाल्यांची कामे जोरात आहे. मात्र गेल्या काही दिसांपासून ही कामे थंडावली आहेत. त्यातच आता शासनाने नगराध्यक्षांचे आर्थिक फाईलवरील स्वाक्षरी करण्याचे अधिकार गोठविले आहे. मनसेच्या लभाने यांना पदावर जेमतेम एक वर्ष मिळाले. विकास कामे हाती घेताच, नगराध्यक्षांवर अविश्वास आल्याची चर्चा होती. मात्र सोबतच सध्या सुरू असलेली विकास कामे जुन्या रेझीममधील असल्याचा दावाही करण्यात येत आहे. मागील काळताच ही कामे मंजर झाली, त्याला मंजुरी मिळाली, असे सांगण्यात येत आहे. काही कामांनाच केवळ लभाने यांच्या कार्यकाळात उर्वरित मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. एकूणच विकास कामांवरूनही आता पुढील काळात श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत.
वणी शहर प्रथम नागरिकाविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2015 02:25 IST