पीक समाधानकारक : चिंता मात्र कायम, दिवसा वीज पुरवठ्याचे आश्वासन फोलपुसद : पुसद तालुक्यासह विभागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी श्रावणातील सरींनी पाठ फिरविल्याने पिके धोक्यात आली आहे. सध्या जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिके आता तहानलेली दिसत आहे. कोमेजणारी पिके पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.श्रावणातील पावसाने पिकांची वाढ जोमाने होते. मात्र यंदाच्या श्रावणात पावसाची प्रतीक्षाच करावी लागली. सुरूवातीला पुसद परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे काही प्रमाणात का होईना पिकांना संजीवनी मिळाली. हातचे जाणारे पीक तरले. परंतु आता गत १५ दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या शेतात पिके डोलू लागली असून सोयाबीन शेंगावर आला आहे तर कपाशी पात्या-बोंडावर आहे. ज्वारीही दाणे कणसात भरण्याच्या अवस्थेत आहे. ढगाळी वातावरणामुळे अळींचा प्रादूर्भाव वाढला असून कपाशीवर मावा, तुडतुडे आदी किडींचे आक्रमण झाले आहे. पाऊस नसल्याने सोयाबीनच्या शेंगा भरणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेते चकाचक दिसत असली तरी पावसाची मात्र शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पोळा, गणपती, गौरी या सारख्या सणांच्या काळात हमखास पाऊस हजेरी लावतो अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अजूनपर्यंत पावसाने हजेरी लावलेली नाही. केवळ दोन दिवसांपासून सर्वत्र ढगाळी वातावरण आहे. आता पिकांचे दाणे भरण्याचा कालावधी असल्याने चिंता वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना पुन्हा पावसाची प्रतीक्षा
By admin | Updated: September 11, 2016 01:06 IST