मारेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये कृषी विभागाच्या आवाहनानुसार खरीप पीक विमा काढला. मात्र पीक विमा काढणारे शेतकरी अद्याप विमा रकमेच्या प्रतीक्षेतच आहेत. विम्याची रक्कम शासनाने संबंधित शेतकऱ्यांना त्वरित द्यावी, अशी विमाधारक शेतकऱ्यांची मागणी आहे़सन २०१३-१४ मध्ये तालुक्यातील सुमारे चार हजार ७५० शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिकांचा चार हजार १५० हेक्टर क्षेत्रासाठी अधिकृत विमा उतरविला होता़ मागीलवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची खरीप पिके उध्वस्त झाली़ आणेवारीसुध्दा ५० टक्केच्या आत आली़ खरिपाची अवस्था चांगली असतानाच, पावसाने थैमान घातले होते़ त्यामुळे शेतातील उभे पीक नष्ट झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले़ त्यातून कसेबसे सावरत रबी हंगामासाठी सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी तयारी केली़ मात्र पीक हातात येतानाच फेब्रुवारी, मार्चमधील अवकाळी पावसाचा रबीला फटका बसल्याने शेतकरी पूर्णत: खचून गेले़ मागीलवर्षी अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांना शासनाने तुटपुंजी मदत केली. मात्र मदतीची रक्कम अजूनही अनेकांच्या हातात पडलीच नाही़ शेतकऱ्यांच्या नावातील चुका, बँकेचे चुकीचे खाते क्रमांक, एकापेक्षा अधिक वारसदार, आदी भानगडींमुळे सर्व रक्कम बँकानी तहसीलदारांकडे परत केली़ ती रक्कम मिळावी म्हणून अजूनही शेतकरी तहसीलमध्ये हेलपाट्या मारत असल्याचे दिसून येत आहे. विविध विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी खचून न जाता यावर्षी पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामाची तयारी केली़ तालुक्यातील काही भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज, उसनवार घेऊन किंवा कृषी केंद्रातून उधारीवर बियाणे, खते खरेदी करून मोठ्या उमेदीने पेरण्या प्रारंभ केल्या़ तथापि आर्थिक विवंचनेत असणारे बरेच शेतकरी पैशाअभावी बियाणे, खते कोठून घ्यावे, या विवंचनेत आहे. शासनाने मागीलवर्षीच्या खरीप पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी, अशी मागणी तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांकडून होत आहे. मागील हंगामात तालुक्यात परजिल्ह्यातील दलाल व अवैध सावकारांनी कर्जासाठी सुमारे १० ते १५ शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्याची उदाहरणे घडली आहेत. मात्र तालुक्यात परवानाधारक अधिकृत सावकार कुणीच नाही. त्यामुळे कर्ज मिळवून देणारे दलाल व संधीसाधू व्यापारी, अवैध सावकार यांच्यापासून शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)
तालुक्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: June 22, 2014 00:12 IST