वातावरण तापले : उमरखेड येथील मेळाव्यात वादळी चर्चाउमरखेड : वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळीच्या निवडणुकीसाठी वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. याच अनुषंगाने बुधवारी दुपारी महागाव मार्गावरील मंगल कार्यालयात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी माजी आमदार अॅड.अनंतराव देवसरकर यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्याचे आवाहन केले. त्यामुळे अॅड.देवसरकर स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे. वसंत सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी गेल्या पाच-सहा दिवसांपासून पुसदच्या नाईक बंगल्यावर व मराठवाड्यातील आष्टीवर यांच्या फार्म हाऊसवर आणि उमरखेड येथील माहेश्वरी यांच्या घरी अनेक गोपनीय बैठका होत आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापत आहे. ही निवडणूक लढण्यासाठी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आज पार पडला. यामध्ये माजी आमदार अॅड.अनंतराव देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, नंदकिशोर अग्रवाल, नारायण भट्टड, चितांगराव कदम, डॉ.विठ्ठल चव्हाण, सविता कदम, छायाताई धूळध्वज, माजी सभापती आत्माराम शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी कोणाही सोबत युती न करता निवडणूक स्वबळावर लढण्याचा सूर कार्यकर्त्यांमधूनही दिसून आला. माजी आमदार अॅड.अनंत देवसरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून वसंतचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश देवसरकर यांच्या गलथान कारभारावर सडकून टिका केली. वसंतच्या निवडणुकीमध्ये प्रकाश देवसरकर यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने उतरण्याचे आवाहन त्यांनी केले. ८४ वर्षीय अॅड.देवसरकर यांनी अतिशय पोटतिडकीने सर्वांना एकत्र येवून लढा उभारायचा संकल्प करण्याचे सांगितले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या मेळाव्यात तालुक्यातील ढाणकी, मुळावा, सुकळी, दिघडी, देवसरी, साखरा, खरूस, विडूळ, मार्लेगाव, टाकळी, तिवडी, पळशी, वानेगाव, तरोडा यासह इतर गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याला उपस्थित असलेले माजी आमदार विजय खडसे व त्यांचे समर्थक तातू देशमुख, रमेश चव्हाण, शैलेश कोपरकर, अरिफ सुरैया, सोनू खतिब, सुनील भरवाडे यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी या मेळाव्याशी आमचा काही संबंध नाही, तसेच अॅड. अनंतराव देवसरकर यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत विजय खडसे यांचा प्रचार केला नसल्याचा आरोप खुलेआम करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी दिसून आली. यावेळी आमपल्या भाषणातून विजय खडसे यांनी १३ मार्चला कार्यकर्त्यांचा व खडसे समर्थकांचा मेळावा घेण्यात येईल व त्यानंतरच कोणासोबत जायचे हे ठरणार असल्याचे सांगितल्याने काँग्रेसमध्ये सरळसरळ अॅड.देवसरकर व विजय खडसे असे दोन गट पडल्याचे दिसून आले. यशस्वीतेसाठी राम देवसरकर, दत्तराव शिंदे, डॉ.कल्याण राणे, अनिल कदम, रामदास कदम, परमेश्वर कदम यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)
वसंत कारखाना निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार
By admin | Updated: March 10, 2016 03:13 IST