यवतमाळ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी ग्राम सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार असून मजूरांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. ही जबाबदारी ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांवर सोपविण्यात आली आहे.‘काम मांगो’ अभियानातून रोहयो कायदा, मजुरांचे हक्क, ग्रामपंचायत सदस्यांची भुमिका सांगण्यात येणार आहे. गावात मुक्कामी राहून ही जनजागृती केली जाणार आहे. कामाची मागणी प्रक्रिया मजूरांना समजावून सांगण्यात येणार आहे. जिल्हा तक्रार निवारण प्राधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत पॅनल गठित केले जाणार आहे. या पॅनलसमोर ग्रामसभेत निराकरण न झालेले मुद्दे मांडले जाणार आहे. तक्रारदाराला तत्काळ उत्तर देणे बंधनकारक राहणार आहे. शक्य नसलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी पॅनलला निश्चित कालावधी देण्याचा अधिकार आहे. या सर्व माध्यमतून रोजगार हमी योजना लोकाभीमुख करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी थेट केंद्रिय ग्रामीण विकास मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यात सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेसाठीसभागृह उपलब्ध करून देणे, अंकेक्षण पथकास पहाणीसाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक, रोजगार सेवक आणि कनिष्ठ शाखा अभियंता यांना उपस्थित राहणे सक्ती केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
‘मग्रारोहयो’साठी ग्राम सामाजिक अंकेक्षण
By admin | Updated: December 1, 2014 23:02 IST