वणी : तालुक्यातून बारमाही वाहणारी विदर्भा नदी पूर्णत: आटल्याने तिचे आता वाळवंटात रूपांतर झाले आहे. नदीत केवळ वाळू व बेशरमाची झाडेच तेवढी शिल्लक आहे. त्याचबरोबर नदीकाठाजवळ असलेल्या कोळसा खाणींमुळे पाण्याची पातळीही खालावली आहे.विदर्भा नदीच्या भरवशावर नदी काठावरील गावाचे जीवन अवलंबून आहे. मात्र यावर्षी विदर्भा नदीची पातळी पूर्णत: खालावल्याने नदीमध्ये केवळ पाण्याचे डबकेच शिल्लक राहिले आहे. या विदर्भा नदीवरून अनेक गावांत नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र नदीमध्ये पाणीच शिल्लक नसल्याने बहुतांश गावांमध्ये एक दिवसाआड पाण्याच्या पुरवठा करण्यात येत आहे. या नदीच्या काठावर कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण व घोन्सा खुली कोळसा खाण अशा दोन खाणी आहेत. या दोन खाणींमधून दररोज हजारो टन कोळसा काढला जात आहे. त्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. परिणामी नदी काठावरील गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.विशेष म्हणजे गाव-खेड्यात असणाऱ्या अनेक बोअरवेललाही पाणी येत नाही. या बोअरवेलजवळ महिला पाण्यासाठी तास न् तास उभ्या राहून मिळेल तेवढे पाणी घेऊन जाताना दिसत आहे. पूर्वी याच बोअरवेलमधून पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत होते. मात्र गेल्या वर्षीपासून ही परिस्थिती बदलली आहे. बोअरवेलची पातळी खालावल्याने बोअरवेलमधून पाणी बाहेर येण्यासाठी किमान १० मिनीटे वेळ लागतो. परिणामी महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एक तर नळाचे पाणीही जास्त वेळ राहत नाही. त्यात महावितरणचे भारनियमनही असते. अनेकदा महिला शेतात गेल्यावर दुपारी नळ सोडण्यात येत असल्याने ते पाणी केवळ रस्त्याने वाहताना दिसत आहे. या नदीचे गेल्या कित्येक दिवसांपासून खोलीकरणही करण्यात आले नाही. सोबतच नदीमध्ये बेशरमाची झाडे, लव्हाळे, झुडूपे वाढली आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहासही अडथळा निर्माण होत आहे. बेशरमाची झाडे आता पुलाच्या बरोबरीने वाढली आहे. ती झाडे काढण्यास संबंधित ग्रामपंचायती अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे नदीतील पाणी आटल्याने जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वीच कोरड्या दुष्काळाने मेटाकुटीस आलेले शेतकरी आता पाण्याच्या टंचाईने त्रस्त झाले आहे. यावर्षी अल्प पाऊस पडल्याने नदीत सध्या पाणीच उरलेले नाही. (कार्यालय प्रतिनिधी)
विदर्भा नदीचे झाले ‘वाळवंट’
By admin | Updated: March 23, 2015 00:07 IST