मूकबधिर मुलीवर अत्याचार : दोन वर्षापूर्वीचे प्रकरण, सत्र न्यायालयाचा निर्णय यवतमाळ : नात्यातील मूकबधिर मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा नराधम यवतमाळ तालुक्याच्या वाटखेड येथील रहिवासी आहे. गणेश मारोती लडके (३५) असे त्याचे नाव आहे. गणेशने त्याच्या नात्यातीलच शेजारी राहणाऱ्या मुकबधिर मुलीचे लैगिक शोषण केले. यातून ती मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार सदर मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने मुलीला विचारणा केली. तिने हातवारे करून आरोपी गणेश लडके याचे नाव सांगितले. या प्रकरणी मुलीच्या आईने ८ जानेवारी २०१४ रोजी यवतमाळ ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ९ जानेवारी २०१४ ला आरोपीस अटक केली. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार दिनकर ठोसरे आणि उपनिरीक्षक दिलीप पोटे यांनी केला. दोषारोपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अरविंद वानखेडे यांच्या न्यायालयाने पाच साक्षीदार तपासले असून पिडीत मुलगी आणि तिच्या आईची साक्ष ग्राह्य धरून आरोपीला दहा वर्ष कारवासा आणि तीन हजार दंडाची शिक्षा ठोठावली. खटल्यात सहाय्यक सरकारी वकील अंकुश देशमुख यांनी युक्तीवाद केला. (कार्यालय प्रतिनिधी)
वाटखेडच्या नराधमास दहा वर्षे शिक्षा
By admin | Updated: September 30, 2016 02:46 IST