रिचा बागला : वस्त्रोद्योगावरील कार्यशाळेत उद्योजकांना आवाहन यवतमाळ : उच्च प्रतीच्या कापूस उत्पादनात अग्रेसर यवतमाळ जिल्ह्यात वस्त्रोद्योग उभारण्यासाठी उद्योजकांनी पुढे यावे, शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, असे आवाहन वस्त्राद्योग महामंडळाच्या संचालक रिचा बागला यांनी बुधवारी येथे केले. महाराष्ट्र राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणांतर्गत वस्त्रोद्योग संचालनालयाकडून उद्योजकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा येथे घेण्यात आली. यात उद्योजकांना संबोधित करताना रिचा बागला बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, विदर्भ चेंबर आॅफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष महेंद्र दर्डा, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुणभाई पोबारू, महेश अग्रवाल, रेमंड युको डेनिमचे व्यवस्थापक नितीन श्रीवास्तव, उद्योजक जे.जे. गिलानी , वस्त्रोद्योगचे सहाय्यक संचालक सिदिक जामा (नागपूर), विभागीय सहाय्यक संचालक नानासाहेब चव्हान, अमरावती विभागाचे उद्योग सहसंचालक अशोक धर्माधिकारी आदी उपस्थित होते. वस्त्रोद्योग धोरणाअंतर्गत राबवायच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. सन २०११-१७ अंतर्गत केद्र पुरस्कृत टफ योजनेशी निगडीत दीर्घ मुदती कर्जावरील व्याज सवलत योजना, अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्यांक समाजाच्या अस्तित्वातील यंत्रमाग घटकांचे आधुनिकीकरणासाठी दहा टक्के भांडवली अनुदान देण्याची योजना, वस्त्रोद्योग संकुलात नऊ कोटी किंवा नवीन प्रकल्प किंमतीच्या नऊ टक्के जी रक्कम कमी असेल ती रक्कम अर्थसहाय्य देणे, सुतगिरण्यांना सध्याच्या आकृतीबंधाप्रमाणे (५:४५:५०) अर्थसहाय्य देण्याची योजना, वस्त्रोद्योग क्षेत्रातील यंत्रमाग कामगारांसाठी घरकूल योजना, कामगार कल्याण योजना आदी सबंधित विभागाच्या साहाय्याने राबविणे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सहकार्याने कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे आदी बाबींचा यात समावेश आहे. व्याज अनुदान योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून विदर्भातील ४३ प्रस्तावांना २६ कोटी ४४ लाख एवढे अनुदान मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या सेमिनारला शहर व जिल्ह्यातील अनेक उद्योजक उपस्थित होते. (प्रतिनिधी)टेक्सटाईल झोनवर होणार अधिवेशनात शिक्कामोर्तब यवतमाळ जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात होणारे उत्पन्न पाहता, येथे कापसावर आधारित उद्योग सुरू व्हावे, रोजगार निर्माण व्हावा या हेतुने यवतमाळ येथे टेक्सटाईल झोन प्रस्तावित असून त्याची अधिकृत घोषणा विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात केली जाणार असल्याचे संकेत कार्यशाळेला उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले. या झोनसाठी ६९ हेक्टर जागाही यवतमाळ एमआयडीसीमध्ये आरक्षित करण्यात आली आहे.
वस्त्राद्योग उभारा, शासन तुमच्या पाठीशी
By admin | Updated: December 3, 2015 02:52 IST