महागावातील शेतकरी : हिरवं शिवार ऊर्जा देणारं, शेतमालाला चांगला दर मिळावा दीपक वगारे महागाव(कसबा) निसर्गाची वक्रदृष्टी तथा शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी पुरता हैराण आहे. प्रचंड मेहनत घेवून चांगले उत्पादन घेतले तर शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. मात्र अशा परिस्थितीतही शेतकरी नवनवीन प्रयोग करतोय. असाच एक अशोक दुधे नामक प्रयोगशील शेतकरी महागाव क. (ता.दारव्हा) येथे आहे. त्याने ऊसाचे पीक घेतलेल्या शेतात चक्क चार आंतरपिकं घेतली असून कुतूहलाचा विषय बनला आहे. अशोक दुधे यांच्याकडील वडिलोपार्जित शेतात आजवर त्यांनी पारंपारिक पध्दतीने पिके घेतली. मागील दोन वर्षांपासून शेतात नवीन प्रयोग करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. उमरखेड तालुक्यात एका शेतकऱ्याने ऊसात गहू हे आंतरपिक घेतल्याचा यशस्वी प्रयोग अशोक दुधे यांनी पाहिला होता. त्या प्रेरणेतून काहीतरी वेगळं करण्याचा संकल्प केला. गतवर्षी ऊसपिकात कांदा, फुलकोबी, सांबार हे तीन आंतरपिके घेतली होती. कांद्याचे चांगले उत्पादन झाले होते. मात्र भाव मिळाला नाही. तरीसुद्धा जिद्द कायम होती. यावर्षी चार एकर ऊस पिकात चक्क चार प्रकारची आंतरपिके घेतली. यामध्ये गहू पिकांसह वांगे, पत्ताकोबी, सांबार या भाजीपाल्याचा समावेश आहे. मोजके मनुष्यबळ व पाण्याचे योग्य नियोजन करून कमी खर्चात त्यांनी शेती फुलविली. ऊसात पाच फुट अंतर ठेवून त्यामध्ये वांगे व गहू पीक घेतले. चार फुट अंतरामध्ये पत्ताकोबी व सांबार पिकविला. सदर पिके सुमारे चार महिन्यात उत्पन्न देणारी आहेत. यावर्षी तरी पिकांना योग्य किंमत मिळेल, असा विश्वास अशोक दुधे यांना आहे. त्यांचा हा आगळावेगळा शेतीप्रयोग प्रेरणादायी असून जिद्द व मेहनतीने बहरलेले पंचपिकांचं हिरवं शिवार नक्कीच ऊर्जा देणारं आहे.
ऊसात घेतली विविध चार आंतरपिके
By admin | Updated: March 2, 2017 00:52 IST