तुमसर : मद्यपींना लवकर झींग यावी याकरिता मोहफूल दारूत स्पिरीटचा सर्रास वापर केला जात असून मोहफूल आंबविण्याकरीता युरिया खताचा वापर केला जातो, अशी धक्कादायक माहिती आहे. दोन्ही पदार्थ मानवी शरीराकरीता अत्यंत घातक आहेत. अशा दारूमुळे ग्रामीण मद्यपींचा जीव धोक्यात आला आहे. बावनथडी, वैनगंगा तथा बावनथडी प्रकल्प परिसरात मोहफूल दारू काढण्याचा गोरखधंदा मागील अनेक महिन्यापासून सुरू आहे.मोहफूल दारू मद्यपींना स्वस्त पडते. विदेशी व देशी दारूची दुकाने गावाकडे नाहीत याशिवाय ती महाग आहे. सहज सुलभ मोहफूल दारू गावा गावात उपलब्ध आहे. बावनथडी नदी, वैनगंगा नदी तथा बावनथडी प्रकल्प खोऱ्यात मोहफूल तयार करणारे अड्डे आहेत. दारू तयार करणारे मोहफुल लवकर आंबविण्याकरिता त्यात यूरीया खत टाकतात. त्यामुुळे मोहफूल फेसाळ होवून लवकर आंबण्याची प्रक्रिया पूर्ण होते. प्रथम टप्पा पूर्ण झाल्यावर दारू तयार झाल्यानंतर त्यात स्पिरीट हा द्रव पदार्थ घालण्यात येत आहे. यामुळै मद्यपीला तात्काळ झींग येते. या झींगीमुळे त्या मोहफूल दारूला मोठी मागणी येते.मानवी शरीराकरीता युरिया व स्पिरीट अत्यंत घातक पदार्थ आहेत. त्यामुळे यकृत, स्वादपिंड, घसा, दातावर विपरीत परिणाम होतो. मागील अनेक महिनापासून मोहफूल दारूत हे घातक पदार्थ घातले जात असल्याची माहिती आहे. मध्यप्रदेशाच्या सीमा भिडल्या असल्याने दोन्ही प्रदेशातील मोहफूल दारूंची ने-आण सुरू आहे. या दारूला ग्रामीण भागात मोठी मागणी आहे. सर्रास अवैध व्यवसायावर अंकुश लावण्याची जबाबदारी गृहखात्याची आहे. परंतु ठोस कारवाई होत नाही. केवळ दंडात्मक कारवाई होते. यात अर्थकारण दडल्याचे सुर्यप्रकाशाइतके सत्य आहे. (तालुका प्रतिनिधी)
मोहफूल दारूत स्पिरीट, युरिया खताचा वापर
By admin | Updated: October 25, 2014 00:57 IST