छोटे दोस्त : विद्यार्थ्यांनी उपचारासाठी दिले खाऊचे पैसेबाभूळगाव : येथील प्रताप विद्यालयातील नववीचा विद्यार्थी शेख फैजान शेख मुश्ताक याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. त्याच्या उपचारासाठी इतर विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे पैसे गोळा केले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या गावात फिरून पैसे गोळा केले. हे पैसे आपल्या मित्राच्या उपचारासाठी शिक्षकांकडे आणून दिले. फैजानचा पाय फ्रॅक्चर होताच शिक्षकांनी अडीच हजार रुपये गोळा करून दिले होते. आता विद्यार्थ्यांनी गोळा केलेले १२ हजार रुपये त्याच्या घरी पोहोचविले. त्यावेळी फैजानला अश्रू आवरता आले नाही. शिक्षक व इतर विद्यार्थीही भावूक झाले. फैजानला वडील नाही. आईला तहसीलकडून श्रावण बाळ योजनेतून दरमहा ६०० रुपये मिळतात. यातून ती संसाराचा गाडा रेटत आहे. फैजानवर यवतमाळ येथील एका खासगी डॉक्टरकडे शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर तो घरी परतला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी अपघात विमा योजना आहे. मात्र त्यात नव्याने आलेल्या दुरुस्त्यांमध्ये विद्यार्थी ४० टक्के अपंग झाला तरच मदत दिली जाते, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
फैजानसाठी एकवटली शाळा
By admin | Updated: September 7, 2015 02:28 IST