नळच नाही : प्राधिकरण म्हणते लवकरच नियमित पाणी यवतमाळ : शहरातील उमरसरा परिसरातील यशोधरानगरात तब्बल दीड वर्षापासून नळाला पाणीच नाही. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल सुरू आहेत. आता २६ जानेवारीपर्यंत या परिसरातील नळांना पाणी येईल, असे आश्वासन जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आले आहे. उमरसरा परिसरातील निखिल नगर, यशोधरानगरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. सुरुवातीला अतिशय फोर्सने या ठिकाणी नळाला पाणी येत असल्याने अनेकांनी या परिसरात घरे बांधली. परंतु नंतर कमी दाबाने आणि गेल्या दीड वर्षापासून नळाला पाणी येणेच बंद झाले. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्राधिकरणाकडून दुर्लक्ष करण्यात आले. उल्लेखनिय म्हणजे पाणी जरी प्राधिकरणाकडून मिळत नसले तरी नळाचे बील नियमित येत आहे आणि नागरिक ते भरतही आहेत. तरीदेखील प्राधिकरणाकडून आवश्यक ते पाऊले उचलली गेली नाही. मध्यतंरी दोन-तीन अभियंता बदलून गेले. नव्याने आलेल्या अभियंत्याला पुन्हा सर्व काही सांगावे लागले. आता नागरिकांच्या संयमाचा बांध फुटल्याने त्यांनी प्राधिकरणावर रोष व्यक्त केल्याने प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहेत. उन्हाळा तर सोडाच पावसाळा व हिवाळ्यातही या परिसरात नळाला पाणी नाही. उल्लेखनिय म्हणजे या परिसरात बोअरवेलला पाणी लागत नाही. त्यामुळे विहिरी व हातपंपही नाही. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. जीवन प्राधिकरणासोबतच आता नगर परिषदने तरी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांमधून होत आहे. (प्रतिनिधी)
उमरसरा परिसर दीड वर्षांपासून तहानलेला
By admin | Updated: January 18, 2017 00:12 IST