हलगर्जीपणा : ठाणेदाराचे घर फोडल्याचे प्रकरण उमरखेड : येथील ठाणेदार शिवाजी बचाटे यांचे अज्ञात चोरट्याने घर फोडल्या प्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत उमरखेड ठाण्याच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांंना निलंबित करण्यात आले आहे.अनिल नेमाडे, आनंद शेळके, विनोद जाधव, केशव चव्हाण अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. घटनेच्या रात्री ते उमरखेड पोलीस ठाण्यात ड्युटीवर होते. यातील दोघांची नाईटगस्त लावण्यात आली होती. मात्र या कामात त्यांनी हलगर्जीपणा केल्याचे आढळून आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी या चौघांना निलंबित केले. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन फौजदार आणि दहा कर्मचाऱ्यांची पेशी घेतली होती. त्यातील चौघांवर कारवाई करण्यात आली. मात्र घटनेच्या रात्री ड्युटीवर असलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही. ठाणेदाराकडील चोरीच्या प्रयत्नात हलगर्जीपणामुळे या चार कर्मचाऱ्यांचा बळी गेल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचे जावई डॉ. माने यांचे घरफोडून चोरट्यांनी दोन लाख ३८ हजारांचा ऐवज लंपास केला होता. त्याचवेळी चोरट्यांनी उमरखेडचे ठाणेदार शिवाजी बचाटे यांचे घर फोडून पोलिसांचे नाक कापले होते. ठाणेदाराकडील चोरीची ही घटना दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न उमरखेड पोलिसांकडून झाला. मात्र ‘लोकमत’ने हे वृत्त छापून सदर गंभीर बाब जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतरच या प्रकरणात चौकशी, पेशी आणि निलंबन ही कारवाई केली गेली. या कारवाईने पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)
उमरखेडचे चार पोलीस निलंबित
By admin | Updated: January 27, 2015 23:39 IST