पुसद : भरधाव वेगाने व निष्काळजीपणे दुचाकी चालवून एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी आरोपीला येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी निना बेदरकर यांनी दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. गणेश बाबूसिंग राठोड (४२) रा.घाटोडी असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील वरूड येथील रहिवासी शोभा किशोर चव्हाण (३९) व सुरज प्रकाश हाटे (२०) हे दोघे २७ एप्रिल २०१३ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास वरूड मार्गाने पायी चालत जात होते. एवढ्यात आरोपी गणेश राठोड याने आपल्या एम.एच.२९/क्यू-५७३९ या दुचाकीने सुरज हाटे याला मागून जबर धडक दिली. या अपघातात सुरज गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शोभा चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड.राजेश जयस्वाल यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यानंतर प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी भारत राठोड याला दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच मृतकाच्या नातेवाईकास पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
मृत्यूस कारणीभूत दुचाकी चालकाला दोन वर्षांची शिक्षा
By admin | Updated: March 26, 2015 02:12 IST