जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून खुनाचे सत्र सुरू आहे. शनिवारच्या रात्री माजी मुख्याध्यापक व एका गुन्हेगारी वर्तुळातील सदस्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच खुनाच्या आणखी दोन घटना मंगळवारी उघडकीस आल्या. घाटंजी तालुक्यातील तरोडा येथे चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून केला गेला. तर वणी तालुक्यातील रासा येथे सांडपाण्याच्या क्षुल्लक वादातून शेजाऱ्याने वृद्धाचा खून केला. खुनाच्या या घटनांनी नागरिक हादरले आहेत. सोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे काय, असा प्रश्नही चर्चिला जात आहे. वणी/पारवा : घाटंजी तालुक्यातील तरोडा येथे चारित्र्यावर संशय घेऊन संगीता वामन भेंडारे (३१) हिचा कुऱ्हाडीचे घाव घालून पती वामन झिबल भेंडारे (३५) याने सोमवारी रात्री ११ वाजता खून केला. वामन हा संगीताच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करत होता. या प्रकाराने त्रस्त झालेली संगीता काही दिवस माहेरी होती. मात्र माहेरकडील मंडळींनी समजूत काढत आणि वामनला समज देत तिला सासरी पाठविले. यानंतरही वामनकडून तिचा छळ सुरू होता. याच प्रकारातून सोमवारी रात्री कुऱ्हाडीचे घाव घालून तिला ठार करण्यात आले. या प्रकाराची माहिती होताच गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या वामनला अटक करण्यात आली. संगीताच्या मागे दोन लहान मुले व परिवार आहे. ही कारवाई ठाणेदार एल.डी. चावरे आणि परिविक्षाधीन पोलीस अधिकारी गौतम तामगाडगे, पोलीस शिपाई बेले, मडावी यांनी पार पाडली. वणी तालुक्यातील रासा येथील कृष्णा दादाजी कुडमेथे (६०) या वृद्धाचा शेजारी तरुण प्रकाश महादेव कुळसंगे (१९) याने सांडपाण्याच्या क्षुल्लक कारणावरून खून केला. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. मंगळवारी सकाळी कृष्णा अंगणात साफसफाई करीत होते. त्यावेळी शेजारी प्रकाश कुळसंगे याने त्यांच्याशी वाद घातला. या वादात प्रकाशने लाकडी दांड्याने कृष्णाच्या डोक्यावर प्रहार केला. ग्रामस्थांनी कृष्णाला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अस्लम खान यांनी तातडीने पोलीस पथक रासाकडे रवाना केले. वृत्तलिहिस्तोवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात आणखी दोन खून
By admin | Updated: September 30, 2015 06:03 IST