लाखरायाजीची घटना : ट्रक चालकासह तीन जण गंभीर जखमी दिग्रस : भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन मजूर ठार, तर तीन जण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास दिग्रस-आर्णी मार्गावरील लाखरायाजीजवळ घडली. चेतन उत्तम पवार (४०), उमेश करपा पेळे (२२) दोघेही रा.रुई तलाव ता.दिग्रस अशी मृतांची नावे आहे. मधुकर गोवर्धन चव्हाण (३८) रा.रुई तलाव, अब्दुल अजीज आणि रऊफ खान दाघेही रा.पुसद अशी गंभीर जखमींची नावे आहे. आर्णी येथून लाकूड भरून ट्रक क्र.एम.एच.३२/ क्यू-३२१६ दिग्रसकडे येत होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या रेती भरलेल्या ट्रॅक्टरला बसली. धडक एवढी भीषण होती की ट्रॅक्टर व ट्रॉली वेगवेगळी झाली. ट्रॉली उलटल्याने त्यावर बसून असलेले चेतन आणि उमेश जागीच ठार झाले, तर ट्रकही उलटल्याने चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी जखमींना दिग्रस रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने तिघांनाही यवतमाळला हलविण्यात आले. मृत चेतन याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे, तर उमेश पेळे याच्या मागे आई, वडील, भाऊ व बहीण आहे. या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
ट्रक-ट्रॅक्टर अपघातात दोन मजूर ठार
By admin | Updated: April 3, 2017 00:17 IST