मोठे वडगाव : ‘एमआर’चे घर भरदिवसा फोडले, तासाभरात गेमयवतमाळ : स्थानिक मोठे वडगाव परिसरातील नरसिंगनगरात वैद्यक प्रतिनिधीचे (एमआर) घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख असा अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. संदीप वसंतराव कोरडे असे यातील फिर्यादीचे नाव आहे. दर्डानगर ते वडगाव ग्रामपंचायतकडे जाणाऱ्या मार्गावरील बजरंग चौकात त्यांचे घर आहे. त्यांच्या मावसबहिणीचे घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सहकार भवनात साक्षगंध होते. त्यामुळे पाहुणेमंडळी घरी होती. त्यांची सतत मंगल कार्यालयात व तेथून घरी ये-जा सुरू होती. दीड वाजताच्या सुमारास कोरडे कुटुंबीय घराला कुलूप लावून मंगल कार्यालयात गेले. तेथून अवघ्या दीड तासाने परत आले असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. जणू पाळतीवरच असलेल्या चोरट्याने घराच्या प्रवेशद्वाराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश मिळविला. बेडरूममधील कपाट फोडून पाटल्या, मंगळसूत्र, अंगठ्या, चेन आणि ३० हजार रुपये रोख असा अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. घटनास्थळी श्वानपथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वान नेहमीप्रमाणे घुटमळले. ठसे तज्ज्ञांना मात्र कपाटाच्या ड्रॉव्हरवर चोरट्याच्या हाताचे ठसे मिळाले. त्याद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न वडगाव रोड पोलीस करीत आहे. भरदिवसा झालेल्या या चोरीने नागरिकांची सतर्कता आणि वडगाव रोड पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. चोरी होवू नये म्हणून कुणी वैयक्तिकस्तरावर तर कुणी सामूहिकस्तरावर रात्रीला चौकीदार ठेवतात. मात्र आता भरदिवसाही चोऱ्या होत असल्याने २४ तास चौकीदार ठेवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अशा चोऱ्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून घरी किमान एक सदस्य ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)सावधान ! कुलूपबंद घरांवर चोरट्यांचा ‘वॉच’लग्नसराईमुळे अनेक कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर जातात. बाहेरगावी जाणारे आपल्या ऐवजाबाबत दक्षता बाळगतात. मात्र शहरातच तासभरासाठी लग्नात जायचे असल्याने कुणी तेवढी काळजी घेत नाही. मात्र नेमक्या या तासभरातच फटका बसतो. चोरटे लग्नाला जाणाऱ्या मंडळींच्या जणू पाळतीवर असतात. कोण लग्नाला गेले, कुणाच्या घराला कुलूप लावले आहे, लग्नाला जाताना समोरचे दार आतून बंद करून (चोरट्याला कुलूप दिसू नये म्हणून) मागच्या दाराला कुलूप लावले गेले का, या सर्व बाबींवर चोरट्यांचा वॉच असतो. संधी मिळताच ते गेम वाजवितात. संदीप कोरडे यांच्याकडील या चोरीने ही बाब उघड झाली आहे. नेमके त्याचवेळात पद्मावती पार्क या भागातही चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला.
अडीच लाखांची घरफोडी
By admin | Updated: April 20, 2016 02:30 IST