लोकमत शुभवर्तमाननेर : निसर्गाच्या अवकृपेने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. अशा स्थितीत पारंपरिक पिकाला सोडून आधुनिक पद्धतीने शेती कशी करावयाची याचा आदर्शच नेर तालुक्यातील पिंप्री येथील मिथून भोंडे या युवा शेतकऱ्याने घालून दिला आहे. टरबुजाच्या शेतीतून त्याने समृद्धीची कास धरली आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिथून भोंडे यांनी आपल्या वडिलोपार्जीत शेतीतच राबायला सुरूवात केली. त्यांनी नवीन कल्पना शेतीत राबविल्या. एक पीक पद्धती ऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत बहुपिकांवर भर दिला. मातीचा पोत पाहून पिकांची निवड केली. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करत पिकांना पाण्याच्या पाळ््या नियमित दिल्या. सुरूवातीच्या काळात संत्रा, पपई या फळ बागांच्या लागवडीतून पदरात निराशाच आली. मात्र नाउमेद न होता मिथूनने हंगामी असलेल्या टरबूज पिकाची लागवड केली. आज चार एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड केली आहे. या ९० दिवसाच्या पिकातून संपूर्ण वर्षभराचे उत्पन्न तो घेत आहे. वर्षातून टरबुजाचे दोन पीक आळीपाळीने घेतो. यासोबतच काही इतरही पिकांची त्याने जोड त्याने घातली आहे. अशा प्रकारे वर्षातून कमीतकमी १६ लाखाचे उत्पन्न त्याला मिळत आहे. वडील शंकरराव भोंडे यांच्या प्रेरणतूनच शेतीची प्रेरणा मिळाल्याचे मिथून मोठ्या अभिमानाने सांगतो. (तालुका प्रतिनिधी)
टरबुजाच्या शेतीतून धरली समृद्धीची कास
By admin | Updated: March 16, 2015 01:55 IST