आईच्या स्वाधीन : मुंबईतून नेले होते पळवूननेर : मुंबई येथे शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या आजोबाजवळून पळवून नेलेल्या आजंती बेडा येथील ऐश्वर्या पवार या पाच वर्षीय चिमुकलीचा तीन वर्षानंतर शोध लागला. मुंबई पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे ऐश्वर्याला आई आणि आजोबा मिळाले. मात्र तीन वर्षाच्या काळात ऐश्वर्याचा छळ झाला असावा असे अनेक बाबींवरून स्पष्ट होते. आजंती बेड्यावरील सुचिता किसन पवार ही वडील राहुल भोसले आणि मुलगी ऐश्वर्या सोबत राहत होते. तीन वर्षांपूर्वी राहुल भोसले हे अपंगत्वावर शस्त्रक्रियेसाठी वाशी (ठाणे) येथे गेले. तेथे सुचिता आणि ऐश्वर्या सोबत होत्या. त्यावेळी रुकीबाई नामक महिलेने ऐश्वर्याला पळवून नेले. या प्रकाराची तक्रार सुचिताने मुंबई पोलिसात दिली. दरम्यान मुले पळवून नेणाऱ्या चार जणांना मुंबई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत दळवी यांनी ताब्यात घेतले. त्यांनी ऐश्वर्यालाही पळविल्याची कबुली दिली. ही माहिती दळवी यांनी ऐश्वर्याचे आजोबा राहुल यांना एका पत्राव्दारे कळविली. त्यांना बोलावून घेत ऐश्वर्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. आज आठ वर्षाची असलेल्या ऐश्वर्याच्या सर्वांगावर शस्त्रक्रियेसारख्या खुणा आहेत. तिच्या शरीरातील काही अवयव काढले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र मुलगी मिळाल्याचा आनंद आईच्या चेहऱ्यावर तर आई मिळाल्याचा आनंद मुलीच्या चेहऱ्यावर झळकत आहे. तीन वर्षानंतर कुटुंबात मुलगी परत आल्यामुळे आजंती बेड्यावर आनंदाचे वातावरण होते. सर्वच जण चिमुकल्या ऐश्वर्याची आस्थेने जवळ घेऊन विचारपृस करत होते. (तालुका प्रतिनिधी)
आजंतीची ऐश्वर्या तीन वर्षांनंतर मिळाली
By admin | Updated: May 17, 2015 00:07 IST