यवतमाळ : जिल्हा वाहतूक शाखेच्या १०० रुपयांच्या चालानला प्रतिसाद न देणाऱ्या ट्रिपल सीट वाहनधारकांना आता थेट न्यायालयात पाठविले जात आहे. गेल्या तीन दिवसात अशी ११० वाहने पकडण्यात आली आहे. आता वाहतूक पोलिसांकडून ट्रिपल सीट वाहन ताब्यात घेतले जाते. वाहनधारकाला चालान दिले जाते. त्याला न्यायालयात पाठविले जाते. तेथे ५०० ते हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो. हा दंड भरल्यानंतरच वाहन सोडण्यात येते. गेल्या तीन दिवसात ट्रिपल सीटची अशी ११० वाहने जिल्हा वाहतूक शाखेने ताब्यात घेतली. ही वाहने सोडविण्यासाठी वाहनधारकांनी न्यायालयात गर्दी केली होती. कोणत्या न्यायालयात प्रकरण आहे ते शोधणे, पुकारा होण्याची प्रतीक्षा करणे, न्यायालय किती दंड ठोठावते हे पाहणे, नंतर हा दंड भरणे व ती पावती दाखवून पुन्हा वाहतूक शाखेत जावून गाडी सोडवून घेणे यात वाहनधारकाचा संपूर्ण दिवस जातो. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी अवलंबिलेल्या या नव्या फंड्याची ट्रिपल सीट वाहनधारकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आतापर्यंत वाहतूक पोलीस ट्रिपल सीटला केवळ १०० रुपये चालान देत होते. हा भूर्दंड आता दहापटीने वाढून सुमारे हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. शिवाय वाहन जप्तीमुळे आणि न्यायालयाच्या येरझारांमुळे होणारा त्रास वेगळाच. गेल्या तीन दिवसात ११० वाहने ताब्यात घेतल्याने वाहनधारकांमध्ये वाहतूक शाखेच्या या नव्या फंड्याची चर्चा होऊ लागली आहे. त्यातूनच ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी नियंत्रणात आल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)
तीन दिवसांत ट्रिपलसीटची ११० वाहने पकडली
By admin | Updated: July 16, 2016 02:40 IST