यवतमाळ : दुचाकी वाहनावर ट्रिपल सिट जाणाऱ्या वाहनधारकाला आता थेट न्यायालयापुढे उपस्थित केले जाणार आहे. ट्रिपल सिट वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने हा नवा फंडा अवलंबिला आहे. शहरात तैनात वाहतूक पोलिसाने तिबल सिट वाहन पकडल्यास त्याला जाग्यावरच १०० रुपये दंड होते. परंतु या दंडाला वाहनधारक जुमानत नसल्याचे पाहून वाहतूक शाखेने अशा वाहनधारकांना आता थेट न्यायालयापुढे हजर करणे सुरू केले आहे. अशा वाहनधारकाला न्यायालय ५०० ते हजार रुपये दंड ठोठावते. वारंवार हा गुन्हा होत असेल तर परवाना रद्द केला जातो. वाहतूक शाखेने आतापर्यंत ४० वाहनधारकांना न्यायालयापुढे हजर केले असल्याची माहिती जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली. एकट्या यवतमाळ शहरात वाहतूक पोलीस दिवसभरात किमान २० ट्रिपल सिट वाहनधारकांना पकडतात. त्या सर्वांना आता न्यायालय समक्ष दंड ठोठावते. ट्रिपल सिट वाहन पकडण्यावर अधिक भर दिला जात आहे. गुन्हा करून पळणे, चोरीचे वाहन घेऊन जाणे अशा प्रकारांना या कारवाईने आळा बसत असल्याचे दिलीप चव्हाण यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
‘ट्रिपल सिट’ची पेशी थेट न्यायालयात
By admin | Updated: July 13, 2016 03:13 IST