एक गंभीर : पुसद-बोरगडी रस्त्यावरची घटना पुसद : वादळ-वारा नसताना अचानक एक निंबाचे झाड धावत्या दुचाकीवर कोसळले. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाला. ही घटना तालुक्यातील बोरगडी मार्गावर शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. बाबूराव नागोराव गोरे (३५) असे गंभीर जखमीचे नाव असून सुनील नाथा बरडे रा. नंदपूर मोहा असे किरकोळ जखमीचे नाव आहे. तालुक्यातील नंदपूर मोहा येथील बांधकाम व्यावसायिक बाबूराव गोरे आणि सुनील बरडे हे दोघे नेहमी प्रमाणे शुक्रवारी सकाळी ९ वाजता आपल्या मोटरसायकलने पुसदहून बोरनगरकडे जात होते. वाटेत बोरगडीनजीकच्या रस्त्याच्या कडेला असलेले निंबाचे मोठे झाड अचानक मुळासकट उन्मळून त्यांच्या दुचाकीवर कोसळले. दुचाकी चालवित असलेल्या बाबूराव यांच्या मानेवर कोसळल्याने त्यांना गंभीर इजा झाली. तसेच त्यांचा तोल गेल्याने ते खाली कोसळले. त्यावेळी दुचाकीवर बसून असलेल्या सुनील बरडे यांनाही किरकोळ इजा झाली. गावकऱ्यांनी तत्काळ या दोघांनाही पुसदच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र बाबूरावची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथे हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.हवी-पाणी आणि कोणतेही वादळ नसताना अचानक झाड कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वृक्ष रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतुकीचीही कोंडी झाली होती. बघ्यांची मोठी गर्दी अपघातस्थळी झाली होती. (प्रतिनिधी)
धावत्या दुचाकीवर वृक्ष कोसळला
By admin | Updated: May 22, 2015 23:56 IST