मुकुटबन : सातबारावरील आजोबाचे नाव कमी करून त्यांच्या वारसांची नावे समाविष्ठ करण्यासाठी नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या झरी तालुक्यातील कोसारा येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडले. राजू बळवंत मोरे असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून तो कोसारा साज्याचा तलाठी आहे. एका शेतकऱ्याची शेती कोसारा साजा अंतर्गत येते. ही शेती त्यांच्या आजोबाच्या नावावर आहे. मात्र काही दिवसापूर्वी त्यांच्या आजोबाचे निधन झाले. त्यामुळे सातबाऱ्यावरील आजोबांचे नाव कमी करून वडिलांचे नाव समाविष्ठ करण्यासाठी सदर शेतकरी तलाठ्याकडे गेला. मात्र नावे वगळण्यास तलाठी तयार नव्हता. यापूर्वी त्याने या शेतकऱ्याकडून चार हजार रुपयांची लाच घेतली होती. पैसे घेऊनही तो शेतकऱ्याचे सातबारावरील नाव कमी करीत नव्हता. यानंतर तलाठी राजू मोरे याने सदर शेतकऱ्याला नऊ हजार रुपयांची मागणी केली. सदर शेतकऱ्याने तलाठ्याला पैसे देण्याचे कबूल केले. त्यानंतर यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. ठरल्याप्रमाणे गुरुवारी सायंकाळी सदर शेतकरी मोरे यांच्या मुकुटबन येथील रामनगरातील निवासस्थानी पैसे घेऊन गेला. नऊ हजार रुपये स्वीकारत असताना सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलाठ्याला रंगेहात पकडले. त्याला मुकुटबनच्या पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, नितीन लेव्हरकर, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, अमोल महल्ले, नीलेश पखाले, गजानन राठोड, शैलेश ढोणे, नरेंद्र इंगोले, सुधाकर मेश्राम, अनिल राजकुमार, भारत चिरडे, किरण खेडकर, विशाल धलवार यांनी केली. (वार्ताहर)
तलाठी एसीबीच्या जाळ्यात
By admin | Updated: November 27, 2014 23:41 IST