पांढरकवडा : शहरातील वाहतूक व्यवस्था पुर्णत: कोलमडली असून वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. परिणामी किरकोळ अपघात होणे नित्याचीच बाब झाली आहे. रस्त्यावर मोकाट जनावरेसुध्दा तासनतास ठिय्या मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.शहरातील राम मंदीर ते आखाडा रोड, चालबर्डी रोड आदी मार्गावर बहुतांश शाळा महाविद्यालये आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांंची या मार्गाने ये-जा सुरुच राहते. चालबर्डी रोडवरील शिबला पॉर्इंटवर प्रवासी वाहतूक करणारी वाहने दिवसभर उभी राहतात. त्यामुळे वाहतूक प्रभावीत होते. शहरात जागोजागी मोकाट जनावरे तळ ठोकून बसतात. विशेषत: स्टेट बँक चौक, तहसील चौक , बिरसा मुंडा चौक, वसंतराव नाईक चौक, बसवेश्वर चौक, जैन चौक व कॉटन मार्केट रोड परिसरात ही समस्या मोठ्या प्रमाणावर आहे.सर्वाधिक रहदारीच्या असलेल्या तहसिल चौकात चारही बाजुने लागत असलेल्या भाजी-पाल्याच्या दुकानांमुळे आणि हातगाड्यांमुळे या चौकाला भाजीबाजाराचे स्वरुप आले असून हा चौक भाजीबाजार चौक बनला आहे. तहसील चौकाचा परिसर हा अत्यंत वर्दळीचा परिसर आहे़ तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, दिवाणी, फौजदारी न्यायालय तसेच जि़प़विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मेन लाइन, आठवडी बाजार आदी ठिकाणी जायचे असेल, तर याच चौकातून जावे लागते़ दिवसभर या चौकात सारखी वर्दळ असते़ परंतु या चौकाच्या चारही बाजुची जागा भाजीची दुकाने तसेच हातगाड्यांनी घेतली आहे़ आता तर संपुर्ण मुख्य मार्गावरच दुतर्फा भाजीची दुकाने व विविध खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्या लागतात. त्यामुळे या रोडवरुन चालणे कठीण झाले आहे. शहरात भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र भाजी मंडी आहे़ परंतु भाजी मंडीतील अनेक दुकाने या परिसरात आली आहे़ त्यामुळे भाजी मंडी ओस पडली आहे. विशेष म्हणजे या तहसिल चौकात भाजीची दुकाने लावण्यासाठी येथील काही स्थायी दुकानदार प्रति दिवसाचे ७०० ते ८०० रूपये भाडे घेतात. काही अतिक्रमणधारक दुकानदारसुद्धा त्यांच्या दुकानांसमोर भाजीची दुकाने लावण्यासाठी ३०० रूपये रोजाप्रमाणे पैसे घेतात . त्याहीपेक्षा विशेष म्हणजे काही अतिक्रमणधारकांनी, तर चक्क अतिक्रमण केलेली जागाच स्वत:ची जागा समजून विकली असल्याची माहिती आहे. मेन लाईनवर सुध्दा रस्त्याच्या दोन्हीही बाजुने भाजी पाल्याची दुकाने आली आहेत.पोस्ट कार्यालयापासून राममंदीर रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्या आणि त्या गाड्यांमुळे होणारी गर्दी, यामुळे हा चौक पार करताना मोठी कसरत करावी लागते़ हॉटेलवाले आपली भांडी रस्त्यावरच धुत असल्यामुळे तसेच कागदी प्लेटा व कचरा रस्त्यावरच टाकतात. त्यामुळे रस्त्यावर नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. मोकाट जनावरांचा या चौकात मुक्तसंचार आहे़ अनेकदा तर ही जनावरे चौकातच ठिय्या मांडुन बसतात़ ही मोकाट जनावरे रोडवर पडून असलेल्या प्लास्टीकच्या पिशव्या आणि सडका भाजीपाला खाताना दिसतात़ त्यामुळे या चौकातील वाहतुक समस्या मोठी बिकट झाली आहे़ (तालुका प्रतिनिधी)
पांढरकवडा शहरातील वाहतूक व्यवस्थेचा उडाला बोजवारा
By admin | Updated: July 8, 2016 02:34 IST