संशोधनाची आवड : बेंडकीपुरातील प्रज्वल वाजेची धडपडयवतमाळ : भरउन्हात मठ्ठा विकत लोकांना गारवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या यवतमाळच्या रँचोने आपल्या कल्पकतेच्या बळावर गारवा देणारी टोपी तयार केली. सौरऊर्जेवर चालणारा पंखा त्याला गारवा देवून जातो. शाळेत शिकत असताना चिकित्सक बुद्ध असलेल्या या रँचोने मठ्ठा विक्रीही आपल्या आवडीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी सुरू केलाय. यवतमाळच्या रस्त्यावर टोपीला पंखा लावलेला हा रँचो आता सर्वांच्या नजरेस पडतो. यवतमाळच्या तलावफैल परिसरातील बेंडकीपुरा भागात प्रज्वल नारायण वाजे हा बालशास्त्रज्ञ राहतो. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची. आई-वडील दोघेही टेलरचे काम करतात. मात्र त्यांच्या घरातील प्रज्वलला शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पडले. यासाठीच तो कुठेही नवीन काही दिसले की चिकित्सक बुद्धीने पाहून तशीच वस्तू तयार करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी लागणारा पैसा घरून मिळणार नाही, याची त्याला खात्री आहे. म्हणूनच तो या आपल्या कारागिरीसाठी यवतमाळ शहरात मठ्ठा विकतो. दहाव्या वर्गाची नुकतीच परीक्षा दिलेला प्रज्वलने गारवा देणारी टोपी तयार केली आहे. त्याचे शिक्षक जोशी यांच्याकडे त्याने अशी टोपी बघितली होती. त्यामुळे त्याची जिज्ञासा जागृत झाली. आपणही अशी टोपी बनवू शकतो म्हणून त्याने धडपड सुरू केली. बाजारातून १०० रुपयाची सोलर प्लेट, दहा रुपयाचा पंखा आणि तेवढ्याच किमतीची मोटर विकत आणली. मोठा भाऊ विदान वाजे याच्या मदतीने ही टोपी तयार केली. एवढेच नाही तर सहा व्होल्टच्या बॅटरीवर चालणारा टेबल फॅनही त्याने तयार केला. यासाठी लागणारे साहित्य तो भंगारातून विकत आणतो. ईलेक्ट्रीकच्या दुकानात तासन्तास पाहून तो जोडणीचे काम शिकला आहे. आता त्याला सोलरवर चालणारी दुचाकी तयार करायची असून त्यासाठी त्याची धडपड आहे. यवतमाळच्या आर्णी मार्गावर प्रज्वल मठ्ठा विकत असला तरी त्याच्या डोक्यात मात्र भन्नाट कल्पना असतात. आपल्याला मोठा शास्त्रज्ञ व्हायचे आहे, असे तो सांगतो. मात्र परिस्थितीमुळे जे शक्य होईल तेच करावे लागणार. आयटीआय करण्याचा त्याने निश्चिय केला असून यातूनच आपण नवनवीन शोध लावणार असल्याचे तो सांगतो. (नगर प्रतिनिधी)
मठ्ठाविक्रेता ‘रॅन्चो’ने शोधला टोपीत गारवा
By admin | Updated: April 21, 2016 02:52 IST