एक टक्का एक्साईज ड्युटी : तोडगा निघेना, आता ५ एप्रिलला यवतमाळात रास्ता रोको व मोर्चा यवतमाळ : केंद्र शासनाच्या एक टक्का एक्साईज ड्युटीला विरोध करीत जिल्हाभरातील सराफ व्यापारी आणि सुवर्णकारांनी पुकारलेल्या ‘सराफा बाजार बंद’चा गुरुवारी ३१ वा दिवस उजाडणार आहे. गेल्या महिनाभरात सराफ व्यापाऱ्यांच्या समस्येवर केंद्र सरकारला तोडगा काढता आलेला नाही. दरम्यान, बुधवारी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व १६ ही तालुक्याच्या सराफ व्यापारी व सुवर्णकारांची बैठक येथे पार पडली. त्यात सराफा बाजारात वेळोवेळी निर्माण होणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये ५ एप्रिल रोजी यवतमाळच्या बसस्थानक चौकात जिल्हास्तरीय रास्ता रोको आणि मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मोर्चाद्वारे सराफ व्यापारी आपल्या मागण्यांकडे राजकीय नेते, सामान्य नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष वेधणार आहे. या मोर्चामध्ये १२०० पेक्षा अधिक सराफ-सुवर्णकार बांधव सहभागी होणार असल्याची माहिती सराफ व्यापारी असोसिएशनचे रत्नाकर पजगाडे यांनी ‘लोकमत’ला दिली. एक टक्का एक्साईज ड्युटीच्या विरोधात वर्धा व यवतमाळच्या व्यापाऱ्यांनी वर्धेमध्ये संयुक्त मोर्चा काढला होता. १७ मार्चला दिल्लीत व २४ मार्चला पुण्यात झालेल्या आंदोलनामध्येसुद्धा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. जिल्ह्यात तालुकास्तरावरही आंदोलने केली गेली. सुमारे महिनाभरापासून सराफा बाजार बंद असल्याने जणू अर्थचक्र थांबले आहे. महिनाभरात यवतमाळच्या सराफा बाजारातील सुमारे १०० कोटींची उलाढाल थांबली ंआहे. लग्न सोहळे, गहाण व्यवसाय, खरेदी-विक्री या सर्वच बाबी सराफ व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रभावित झाल्या आहेत. या काळात शासनाचा व्हॅटही मोठ्या प्रमाणात बुडला आहे. सराफ व्यापाऱ्यांचा एक टक्का एक्साईज ड्युटीला मुळीच विरोध नाही, मात्र त्यापोटी ठेवाव्या लागणाऱ्या रेकॉर्डला हा विरोध असल्याचे सांगण्यात आले. एक्साईज ड्युटी ग्राहकांकडून वसूल केली जाणार असून जुन्या सोन्यावरही ती लावली जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
सराफ व्यापाऱ्यांच्या बंदचा आज ३१ वा दिवस
By admin | Updated: March 31, 2016 02:58 IST