दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू : नेहरू चौकातील घटना, चैत्र नवरात्राच्या रंगरंगोटीदरम्यान आघातयवतमाळ : टळटळीत दुपारी दीड वर्षाच्या चिमुकलीला तहान लागली. ती कुणाला पाणी मागू शकली नाही. तिला जवळच पाण्याची बाटली दिसली. ते ती गटागटा प्यायली. पण, ते पाणी नव्हे तर टर्पेंटाईन होते. क्षणातच तिच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. चैत्र नवरात्रासाठी घराची रंगरंगोटी करीत असलेला तिवारी परिवार या घटनेने शोकसागरात बुडाला आहे.पियू चेतन तिवारी (दीड वर्ष) रा. नेहरू चौक, यवतमाळ असे मृत चिमुकलीचे नाव आहे. पियूचे वडील आणि तिचे मोठे बाबा गोपाल नवरात्र उत्सवासाठी सोमवारी दुपारी रंगरंगोटीचे काम करत होते. सणाच्या तयारीसाठी सर्व जण उत्साहात होते. विशेष म्हणजे, चिमुकल्या पियूचा जन्म हा १३ आॅक्टोबर २०१५ रोजी अश्विन नवरात्रातच झाला होता. वडील घरात रंगरंगोटी करीत असताना चिमुकली पियू त्यांच्या मागे-पुढे खेळत होती. दरम्यान, तिचे लक्ष छोट्या बिसलरी बॉटलकडे गेले. तिने पाणी समजून त्या बॉटलमधील द्रव प्राशन केले. काही मिनिटातच तिच्या तोंडातून फेस यायला लागला. हा प्रकार कामात मग्न असलेल्या वडलांच्या थोड्या उशिराने लक्षात आला. त्यांनी तातडीने तिला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही पियूची प्राणज्योत सायंकाळी ६.३० च्या सुमारास मावळली. या घटनेने नेहरू चौक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पियूच्या आईचे तर पंचप्राणच हरपले आहे. पियूला प्रणव नावाचा (२ वर्ष) मोठा भाऊ आहे. तिच्या जाण्याने संपूर्ण तिवारी परिवारच शोकसागरात बुडाला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
पाणी समजून चिमुकलीने टर्पेंटाईन पिले
By admin | Updated: March 28, 2017 01:21 IST