किशोर वंजारी - नेरआईच्या सहवासासाठी कोणताही जीव कासावीस होतो. त्या माऊलीच्या सहवासाची ऊब उभ्या आयुष्यात अनेक संकट झेलण्याची ताकद देते. नेर ग्रामीण रुग्णालयातील घटनेने मात्र हे सर्व परिमाण मोडीत काढले. मायेची ऊबच अडीच महिन्याच्या चिमुकलीसाठी काळ ठरली. नियतीच्या या खेळीने आईवर निरागस मुलीच्या मृत्यूचे पातक ओढवले आहे. सहज लागलेला डोळा पोटाशी असलेल्या मुलीसाठी काळ ठरला. तीन चिमुकल्यांचा सांभाळ करणारी आजंती येथील ३५ वर्षीय माता कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी नेर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. सोबत अडीच महिन्याची चिमुकलीही होती. दुपारी पलंगावर पहुडली असताना त्या मातेचा सहज डोळा लागला. आईच्या सहवासात निर्धास्त होऊन बागडणारी ती अडीच महिन्याची बालिकाही आनंदात होती. काही क्षणातच त्या मातेचा डोळा लागला. रुग्णालयातील तो लोखंडी कॉट मायेने भारावलेला असतानाच अगदी क्षणभरात चिमुकलीच्या मृत्युचा साक्षीदार ठरला. डुलकी लागल्याने आईच्या पोटाशी असलेली बालिका कधी त्या खाली दबली हे तिला कळलेच नाही. मायेची ऊब असणाऱ्या कुशीतच दबून त्या चिमुकलीचा श्वास रोखला. मुलीला जवळ घेऊन निर्धास्तपणे वामकुकशी घेणाऱ्या मातेला हे कळलेच नाही. जेव्हा जाग आली तेव्हा नेमकं काय झालं याचं भान त्या मातेला राहिले नाही. आपल्या चिमुकलीच्या मृत्युसाठी आपणच कारणीभूत ठरलो, हे लक्षात येताच तिने हंबरडा फोडून आक्रोश व्यक्त करणे सुरू केले. नेमका काय प्रकार आहे हे लक्षात न आल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह इतरही रुग्ण, त्यांचे नातेवाईक सुन्न झाले. घटना घडली हे लक्षात आल्यानंतर उपस्थितांपैकी सर्वांनाच जबर हादरा बसला. आता या प्रकरणात कोणती नोंद घ्यावी, असा पेच नेर पोलिसांपुढे निर्माण झाला आहे.
मायेची ऊब ठरली बालिकेचा काळ
By admin | Updated: December 11, 2014 23:14 IST