गाय, घोडा फस्त : ग्रामस्थांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण वणी : झरीजामणी तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या जुनोनी परिसरात आता पुन्हा वाघाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी वाघाने एक गाय व घोड्याला ठार केले, तर एक गाय गंभीर जखमी झाली. तालुक्यातील दहेगाव येथील चेतन गोहोकार यांच्या दोन गाई शुक्रवारी दुपारी जुनोनीच्या जंगलात चरत होत्या. दरम्यान, या दोन्हीही गायीवर वाघाने अचानक हल्ला केला. त्यात एक गाय जागीच ठार झाली, तर दुसरी गाय गंभीर जखमी झाली. याबाबत गोहोकार यांनी त्वरित वनविभागाला माहिती दिली. तेव्हा वनविभाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्याचदिवशी जंगलात चरत असलेला साहेबराव मायनर यांच्या घोड्यावर वाघाने हल्ला करून घोडा ठार केला. या दोन्ही घटनेमुळे जुनोनी व घोन्सा परसिरातील ग्रामस्थांसह शेतकरी, शेतमजूर चांगलेच धास्तावले आहे.गेल्या दोन-चार महिन्यांपूर्वी याच परिसरात वाघाने धुमाकूळ घालून गाय व बैलाला ठार केले होते. त्यानंतर वाघ या परिसरातून गायब झाला होता. जनावरांवरील हल्लेही थांबले होते. मात्र आता पुन्हा वाघाने जनावरांवर ऐन शेतीच्या हंगामात हल्ले सुरू केल्याने शेतकरी व शेतमजूर चांगलेच धास्तावले आहे. झरी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही घनदाट जंगलाला लागूनच आले. आता शेतीचा हंगाम सुरू झाल्याने जवळपास सर्वच शेतकऱ्यांची पेरणी आटोपली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र वाघाने पुन्हा हल्ले सुरू केल्याने शेतमजूरांमध्ये धास्ती पसरली आहे. एखाद्या गाईवर किंवा बैलावर हल्ला केल्यानंतर घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी येऊन पंचनामा करतात. तेव्हा गावकरी नेहमी या कर्मचाऱ्यांवर आपला रोष व्यक्त करून वाघाला जेरबंद करण्याची मागणी करतात. मात्र वनाधिकारी व कर्मचारी शेतकरी, गावकऱ्यांना आश्वासन देऊन तेथून काढता पाय घेतात. वन विभागाच्या या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांवर मात्र शेती करण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष देऊन या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
जुनोनी परिसरात वाघाची दहशत
By admin | Updated: June 29, 2015 00:15 IST