पाच वाहनांना उडविले : चार जखमी, हॉटेलच्या भिंतीवर कार धडकली, संतप्त जमावाकडून तोडफोड यवतमाळ : एका मद्यपी चालकाने आपल्या सुसाट कारने एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास येथील आर्णी रोडवर घडली. या अपघातानंतर संतप्त जमावाने सदर कारची प्रचंड तोडफोड केली. पुणे येथील सूर्यकांत घुले यांच्या मालकीची कार (एम.एच.१२/ई.टी.-४५४७) यवतमाळला आली होती. ही कार बुधवारी रात्री आयुर्वेद महाविद्यालयाकडून आर्णी नाक्याकडे जाण्यासाठी निघाली. मात्र शिक्षक असलेला चालक अरविंद मडावी (रा.डेहणकर ले-आऊट, यवतमाळ) हा नशेत असल्याने त्याच्या सुसाट कारने या रोडवरील पाच वाहनांना धडक दिली. आयुर्वेदिक कॉलेज, प्रोव्हीजन्स, हॉटेल व बिछायत केंद्राजवळ ही धडक देण्यात आली. एकापाठोपाठ वाहनांना धडक देत ही कार वरण्यम् हॉटेलच्या भिंतीवर धडकली. या घटनेत मंगेश आदे (३८) रा.शास्त्रीनगर, दिनेश सिद्धनाथ शिंदे (२१) रा.आर्णी रोड यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एकाला नागपूरला हलविण्यात आले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या उपस्थित जमावाने सदर कारची प्रचंड तोडफोड केली. या कारचा अक्षरश: चेंदामेंदा केला. यावेळी चालकालाही चोप दिला गेला. यावेळी आर्णी नाक्यावर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे आर्णी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. यातील मद्यपी कारचालक जखमी झाल्याने त्यालाही उपचारार्थ दाखल करण्यात आले. वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (शहर वार्ताहर)
मद्यपी कारचालकाचा आर्णी रोडवर थरार
By admin | Updated: November 3, 2016 03:18 IST